कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीचा मुहूर्त समीप येऊन ठेपला असताना हद्दवाढविरोधी कृती समितीने पुन्हा एकदा टोकाच्या आंदोलनाचे हत्यार मंगळवारी उगारले. जिल्हाधिकारी अमित सनी यांना भेटलेल्या कृती समितीने हद्दवाढीस असलेला विरोध कायम असल्याचे सांगत हद्दवाढीची अधिसूचना शासनाने काढू नये अशी मागणी केली. तर, या मागणीच्या समर्थनासाठी बुधवारी प्रस्तावित सर्व १८ गावांत बंद ठेवण्यात येणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. सनी यांनी बंद मागे घेण्याची सूचना कृती समितीने नाकारली.

महापालिकेच्या हद्दवाढीचा निर्णय घेणारी अधिसूचना १-२ दिवसांत निघणार असल्याचे सांगण्यात येते. भाजपने त्या साथीदाराने आंदोलन सुरू केले आहे. या पाश्र्वभूमीवर हद्दवाढविरोधी कृती समितीने आपली विरोधाची भूमिका जिल्हाधिकाऱ्यांकडे आज मांडली. समितीचे निमंत्रक नाथजी पोवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, एस. आर. पाटील, सेनेचे जिल्हा परिषद सदस्य बाजीराव पाटील आदींनी हद्दवाढीला विरोध केला. हद्दवाढीबाबत शासनाची द्विसदस्यीय समिती दोन दिवस जिल्ह्याच्या दौऱ्यावर आली असताना हद्दवाढीतील प्रस्तावित सर्व १८ गावांनी सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवून आपल्या संतप्त भावना दर्शविल्या होत्या, याकडे लक्ष वेधून कृती समितीने अधिसूचना काढण्यास विरोध केला. पुन्हा १८ गावात बंद, राष्ट्रीय महामार्ग रोको आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. अधिसूचना निघाली तरी त्यानंतर हरकती मागवल्या जाणार असल्याचे नमूद करून सनी यांनी बंद मागे घेण्याचे आवाहन केले, पण त्यास कृती समितीने नकार दिला.

१८ गावांमध्ये बंदला प्रतिसाद मिळाल्याने व्यवहार पूर्णत: ठप्प होते. यातून लोकभावना दिसून येतात. त्यामुळे हा प्रश्न मी, चंद्रदीप नरके, आमल महाडिक हे तिन्ही आमदार विधिमंडळात उपस्थित करणार आहे, असे आमदार सुजित मिणचेकर यांनी आज सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी चच्रेचा शब्द दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

महाडिक यांचे मौन

आमदार सुजित मिणचेकर यांनी तिन्ही आमदार विधिमंडळात आवाज उठवणार असल्याचे म्हटले असले तरी भाजप आमदार महाडिक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मौन पाळले. भाजपचे धरणे आंदोलन सुरू असताना आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील हद्दवाढीसाठी प्रयत्नशील असताना महाडिक यांना विरोध करणे गरसोयीचे ठरणार आहे.