कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीला विरोध दर्शवण्यासाठी बुधवारी सर्व सतरा गावांत बंद पाळण्यात आला. हद्दवाढविरोधी कृती समितीच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागातील नागरिकांनी  ग्रामपंचायतीजवळ एकत्र जमून हद्दवाढीच्या विरोधात घोषणा दिल्या. अनेक जिल्हा मार्गावर रास्ता रोको आंदोलन केल्याने वाहतूक बराच काळ विस्कळीत झाली. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ग्रामस्थांनी बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन व्यवहार बंद ठेवले.

शिरोली या औद्योगिक वसाहत असलेल्या गावातील सर्वपक्षीय कृती समितीचे पदाधिकारी ग्रामपंचायत चौकात जमले. गावातून निषेध फेरी काढून पुणे बंगळूर महामार्ग रोखण्यासाठी सर्वजण सांगली फाटा येथे आले असता पोलिसांनी महामार्ग रोखण्यासाठी मनाई केली. त्यामुळे आंदोलकांनी कोल्हापूर सांगली राज्यमार्गावर आंदोलन करून राज्यमार्ग सुमारे तीस मिनिटे अडवला. यावेळी आंदोलकांनी हद्दवाढ रद्द झालीच पाहिजे, रद्द करा रद्द करा हद्दवाढ रद्द करा अशा निषेधार्थ घोषणा दिल्या.  हद्दवाढ रद्द झाली नाही तर बेमुदत महामार्ग रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा शिवसेना तालुका प्रमुख बाजीराव पाटील यांनी शासनाला दिला, काँग्रेसच्या काळात आम्ही हद्दवाढ करू दिली नाही, आता भाजप सेनेच्या आमदारांनी हद्दवाढ रद्द करावी असे आवाहन राष्ट्रीय काँग्रेसचे शशिकांत खवरे यांनी केले. आंदोलकांना शिरोली पोलिसांनी ताब्यात घेतले आणि ठाण्यात आणून एका तासाने सोडून दिले.

हद्दवाढविरोधी कृती समितीच्या आवाहनानुसार करवीर पूर्व भागात कडकडीत बंद पाळण्यात आला. गांधीनगरसह गडमुडिशगी वळीवडेत ग्रामास्थांनी सर्व व्यवहार बंद ठेवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संपूर्ण गांधीनगर बाजारपेठेत शुकशुकाट होता. गडमुडिशगी येथेही कडकडीत बंद पाळण्यात आला. शिवाजी चौक, आंबेडकर चौक, आण्णा भाऊ साठे चौक, मराठा चौक, मेन रोडवर शुकशुकाट होता.

वळीवडेचे सरपंच रेखाताई पळसे, उपसरपंच सचिन चौगुले यांच्यासह सर्व ग्रमापंचायत सदस्यांनी बंदमध्ये सहभाग देऊन सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन केले. सर्व संस्था, दुकाने बंद राहिली. हद्दवाढीच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी घोषणा देत बंदचे आवाहन केले. साधारणपणे अशीच स्थिती बंदमध्ये सहभागी १८ गावांमध्ये होती.