हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी व शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वत:ची मालमत्ता गहाण ठेवून ‘दौलत’ सुरू करण्याचा उद्देश होता. पण कोणाच्या तरी इच्छेखातर व महत्त्वाकांक्षेपोटी, राजकीय हेतूने संचालकांविरोधात चाललेला प्रकार पाहता हा कारखाना चालविण्यास घेण्याबाबत जिल्हा बँकेशी केलेला करार रद्द करीत असल्याची माहिती कुमुदा शुगर्स प्रा.लि.चे डॉ. अविनाश भोसले यांनी दिली आहे.
‘कुमुदा’ने एक कोटी बयाणा रक्कम भरून भाडेतत्त्वावर चालविण्याबाबत जिल्हा बँकेशी करार केला होता. कारखाना ताब्यात घेताना दहा कोटी रुपये व उर्वरित पंधरा कोटी मार्चअखेर भरण्याची तयारी त्यांनी दर्शवली होती, पण त्यानंतर ‘दौलत’अंतर्गत राजकारणामुळे अडथळे निर्माण करण्याचे काम काही मंडळींनी केले. जिल्हा बँकेचे कर्ज भागवण्यासाठी स्वत:ची मालमत्ता तारण ठेवून कर्ज काढण्याचे नियोजन केले होते. पण काही मंडळींचे ‘दौलत’ सुरूच होऊ नये, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यांना कंटाळून कारखाना चालवण्यास घेण्याचा निर्णय रद्द करत असून, भविष्यात शेतकरी व कर्मचाऱ्यांनी आपली भूमिका जाहीर करून प्रतिसाद दिल्यास याबाबत पुनर्वचिार करू, असेही डॉ. भोसले यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.