18 January 2019

News Flash

कृषी प्रदर्शनांना राजकीय आखाडय़ाचे रूप

शेतकऱ्यांच्या गरजा केंद्रस्थानी ठेवण्याची मागणी

माहितीपेक्षा राजकीय नेतृत्व वाढविण्यावर भर; शेतकऱ्यांच्या गरजा केंद्रस्थानी ठेवण्याची मागणी

शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न राजकारणाच्या केंद्रस्थानी येऊ लागल्याने शेतकऱ्यांना आकृष्ट करण्याचा आटापिटा राजकीय पक्ष , स्थानिक नेत्यांनी सुरु केला आहे . यातून शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचा मार्ग गवसणारा आणि  संयोजक पुढाऱ्यांना मताच्या बेगमीचा रस्ता  मिळवून देणारा  ‘भव्य शेतकरी प्रदर्शन ’ नावाचे अभियान राज्यभरात  भलतेच जोरात आले आहे. प्रसंगी राजकीय बळाचा  वापर करून कृषी विभागाला आणि त्याद्वारे कृषी उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना वेठीस धरून  शहर – तालुक्यांमध्ये अशी प्रदर्शने  भरवण्याची स्पर्धाच लागली आहे. एका चांगल्या उपक्रमाला आता राजकीय आखाडय़ाचे स्वरूप मिळू लागले असून, प्रदर्शन भरवले जाऊ नये यासाठी अडवणुकीची भूमिका घेतली जात आहे. कोल्हापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक आणि काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री आमदार  सतेज पाटील यांच्यात याच  मुद्दावरून पुन्हा एकदा वादाने उचल खाल्ली.

गतवर्षी जून महिन्यात राज्यातील शेतकऱ्यांनी संप केला. या आंदोलनामुळे शासनाची  कोंडी झाली. अखेर योग्य वेळेच्या शोधात असलेल्या मुख्यमंत्र्यांना कृषी कर्जमाफीचा निर्णय घेणे भाग पडले. कृषी कर्जमाफीतील गुंतागुंत, घोळ, प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा होणे, कापसावरील गुलाबी कीड, उसाच्या एफआरपीची घोळ अशा कारणांनी आजही शेती आणि शेतकरी चच्रेच्या केंद्रस्थानी राहिला आहे. अनेक कारणांनी अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी शासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये आधुनिक शेती कशाप्रकारे करावी, त्यासाठी नवतंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, शासकीय योजना कोणत्या, त्याचा लाभ कसा मिळवावा आदींचा समावेश आहे. शासनाचे हे धोरण कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत नेले जाते. हल्ली हेच काम जिल्हा-तालुक्यातील आजी-माजी, भावी आमदार – खासदार ‘भव्य शेतकरी प्रदर्शन ’ नावाने करत आहेत. किंबहुना, अशा शेतकरी प्रदर्शनाचा शहर – तालुक्यात सध्या सुकाळ आहे.

राजकारण्यांनी संधी साधली

कोल्हापूर जिल्ह्य़ात पाण्याची मुबलक उपलब्धता, उत्तम हवामान , कृषी पूरक सहकारी-खाजगी संस्था यामुळे येथे शेती चांगलीच बहरली आहे. शेतीत वेगळे प्रयोग करून भरगोस पीक मिळवण्याची नामी संकल्पना अनेक शेतकऱ्याच्या ठायी रुजली आहे. याबाबतची माहिती अशा प्रकारच्या कृषी प्रदर्शनांतून मिळण्याची शक्यता वाटत असल्याने त्याची पावले आपसूकच इकडे वळतात. ही बाब चाणाक्ष राजकारण्यांच्या नजरेतून सुटली नाही. त्याचा अचूक फायदा उठवत स्थानिक लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदारसंघात अशी प्रदर्शने भरवण्याचा सपाटा  लावला आहे.

स्वार्थ आणि परमार्थही

कृषी प्रदर्शन भरवणे म्हणजे फारशी तोशिष लावून न घेता घाऊक प्रसिद्धी मिळवण्याचा हमखास मार्ग बनला आहे . कृषी प्रदर्शन भरवण्यासाठी  शासनाकडून पूर्वी दोन लाखापर्यंत अनुदान मिळायचे.  शिवाय , कृषी विभागाला यात समाविष्ट केले की त्यांचे मनुष्यबळ , शासकीय प्रसिद्धी याचा लाभ होतो.  कृषी  विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कधी गळ  घालून तर कधी  दबाव आणून  मोठ्या कंपन्यांना सहभागी होण्यास भाग पाडले जाते. कृषी प्रदर्शनाच्या हिरवाईच्या आत सुप्त अर्थकारणाची  गंगा वाहत राहते.  नव्याच्या शोधात असलेल्या शेतकऱ्यांची  पावले प्रदर्शनाकडे वळतात. पण त्याच्या नजरेला पडते ते वेगळेच. शेतकऱ्याला संगोपन करता येणार नाही , पण त्याचे डोळे दिपतील असे प्रचंड  आकाराचे कोंबडे, शेळी – बोकड, म्हैस – रेडा असे पक्षी – प्राणी आणले जातात, त्यांना पाहण्यासाठी तुडुंब गर्दी उसळते. आपोआपच संयोजक नेत्यांचा  बोलबाला होतो. निवडणूक काळात शेतकऱ्यांचे कैवारी कसा आहोत हे सांगण्यास अशा प्रदर्शनाचा मळा उपयोगी पडतो.

 कृषी प्रदर्शनाच्या मागे राजकीय हिशेब

जलसिंचनातील अडवा आणि जिरवा धोरण कृषी प्रदर्शनाला लागू पडत आहे. कोल्हापुरातील खासदार धनंजय महाडिक आणि  आमदार  सतेज पाटील यांच्यातील ताजे उदाहरण हेच दर्शवणारे आहे. आपल्या भीमा कृषी प्रदर्शनाला पाटील यांच्या नेतृत्वाखालील महापालिकेने परवानगी दिली नाही, असे म्हणत महाडिक यांनी मंत्रालय गाठले. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी असलेल्या जवळीकतेचा लाभ मिळवत प्रदर्शनाला नेहमीचीच  जागा मिळवली. परतफेड म्हणून महाडिक यांनी मंत्री पाटील यांना प्रजासत्ताकदिनी उद्घाटक म्हणून निमंत्रित केले आहे. आमदार पाटील यांनी महापालिकेने कोणतेही मदान प्रदर्शनासाठी द्यायचे नाही असा ठराव केला असल्याने आपण कोणाच्याही आडवे गेलो नसल्याचे स्पष्ट केले आहे, उलट आपण आयोजित केलेले प्रदर्शन खाजगी जागेत भरवल्याकडे लक्ष त्यांनी वेधले.

कृषी विभागाचा सवतासुभा

कृषी प्रदर्शनाचा सुकाळ होऊन जवळपास सर्व तालुक्यात आयोजन होऊ लागले आहे. अशा सर्वच प्रदर्शनाला शासकीय अनुदान देणे शक्य नाही. त्यामुळे यावर्षी पासून कृषी विभागाने आपले स्वतंत्र कृषी प्रदर्शन भरण्यास सुरुवात केली आहे. चंद्रपूर येथे पहिले जिल्हास्तरीय प्रदर्शन पार पडले. अन्य जिल्हयातही  याचे आयोजन केले जाणार असून त्यासाठी पुरेशी आíथक तरतूद केली आहे. कोल्हापुरात असे प्रदर्शन फेब्रुवारीच्या मध्यास भरवण्यात येणार असल्याचे कृषी अधीक्षक बसवराज मास्तोळी यांनी लोकसत्ताला सांगितले.

शेतकऱ्यांच्या पदरी काय?

समृद्ध शेतीच्या शोधात असलेला बळीराजा हरेक कृषी प्रदर्शनाला नव्या जोमाने-उत्साहाने हजेरी लावतो. मात्र, त्याला हवी असणारी माहिती मिळत नसल्याची तक्रार बळीराजा करतो. खानपान व्यवस्था, घरगुती वापराचे साहित्य याचीच भरमाड येथे असते. हल्ली शेतकरी आपला मळा बारमाही फुलता राहील याची काळजी घेऊन उत्तम प्रकारचे उत्पादन घेतो, पण त्याला उत्पादित माल  देश-विदेशातील बाजारात कसा विकावा, याबाबतची माहिती कृषी प्रदर्शनात अभावानेच दिली जाते. त्यामुळे शेतकरयांच्या गरजा केंद्रस्थानी ठेवून प्रदर्शने भरवली  गेली तर त्याला अर्थ प्राप्त होईल, असे मत शेतीमाल मार्गदर्शक, प्रगतिशील शेतकरी अमर गुरव यांनी व्यक्त केले.

First Published on January 26, 2018 1:51 am

Web Title: agricultural exhibition in kolhapur