शेतीमालाची थेट ग्राहकांना विक्री करण्याचा प्रयोग कोल्हापूर जिल्ह्यात मूळ धरू लागला आहे. कवडीमोलाने मालाची विक्री होण्याऐवजी किमान घामाचे दाम मिळू लागल्याने बळीराजा सुखावला आहे. तर बाजारातील अवाच्या सवा किमती माल घेण्याऐवजी निम्म्या किमतीत ताज्या वस्तू मिळू लागल्याने ग्राहकांच्या चेहऱ्यावर हास्य पसरले आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी हा प्रयोग राबवताना दलालांची फळी मोडून काढली असून त्यांच्या मनमानी नफेखोरीला वेसण घातली आहे.
शेतीमालाला वाजवी भाव मिळून शेतकऱ्यांना होणारा लाभ आणि निम्म्या किमतीत ग्राहकांना थेट शेतातून उपलब्ध होणारा ताजा शेतीमाल असा दुहेरी फायदा मिळवू देणारा रयतु बाजारच्या धर्तीवरील राज्यातील शेतीमाल विक्रीचा प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी राबवण्यास सुरुवात केली आहे. त्याची सुरुवात करताना शेतकऱ्यांना दलालांच्या टोळीकडून दमदाटी होऊ लागल्याचे प्रकार पुढे आला पण शेतकऱ्यांना ताकद देण्यासाठी काही तरुणांबरोबरच शासकीय अधिकाऱ्यांनी मदतीची भूमिका घेतल्याने एक आश्वासक वातावरण निर्माण झाले आहे.
काळ्या मातीत घाम गाळणाऱ्या शेतकऱ्यांना उत्पादित माल विकताना दलालांकडून मिळेल ती रक्कम खिशात घालावी लागते. आता शेतकरी उत्पादित केलेला माल शहरांमध्ये आणून त्याची थेट ग्राहकांना विक्री करू लागल्याने चार पसे अधिक मिळत आहेत. तर ग्राहकांना स्वस्तात ताजा शेतीमाल उपलब्ध होत आहे. असा दुहेरी फायदा या उपक्रमामध्ये असल्याने याच संकल्पनेवर आधारित राज्यातही या उपक्रमांना शेती विभागाकडून प्रोत्साहनांची भूमिका घेतली जात आहे.
पंधराशे एकरामध्ये प्रयोग
हातकणंगले तालुक्यातील वारणा-कुंभोज परिसरातील सुमारे पाचशे एकर शेतीमध्ये भाजीपाला, फळे असा शेतीमाल थेट ग्राहकांना विकण्यासाठी शेतकरी सज्ज झाला आहे. त्याला सांगली जिल्ह्यातील बहादूरवाडी परिसरातील ९०० एकर शेतकऱ्यांची साथ मिळणार असल्याने शहर, तालुक्याच्या ठिकाणी ग्राहकांना स्वस्तात ताजा शेतीमाल उपलब्ध होईल, असा विश्वास नेज येथील शिवशक्ती शेतकरी मंडळाचे अमर गुरव यांनी व्यक्त केला.
शेतकरी संघटना बळीराजाच्या पाठीशी
अपार कष्ट करूनही शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला अत्यल्प किंमत मिळत राहिल्याने शेती नेहमीच तोटय़ाची बनली आहे. यावर उपाय ठरणारा शेतकरी-ग्राहक यांच्यातील संबंध सुधारणारा शेतमाल विक्रीचा उपक्रम राबवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना सहकार्याची भूमिका घेणार आहे. शेतकरी-ग्राहक यांना त्रास देणाऱ्या दलालांच्या टोळीचा बंदोबस्त करण्यास संघटना सक्षम असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.