केंद्र शासनाने मंजूर केलेल्या कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. यातून खाजगी कंपन्यांचे आर्थिक हित साधले जाणार आहे. त्यामुळे या विधेयकाच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने उद्या शुक्रवारी राज्यभर विधेयकाची होळी करून निषेध व्यक्त केला जाणार आहे, अशी माहिती संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी गुरुवारी दिली.

केंद्र शासनाने मंजूर केलेल्या नव्या कृषी विधेयकामुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान होणार आहे, अशी टीका शेट्टी यांनी विधेयक मंजूर झालेल्या दिवशी केली होती. त्याचवेळी त्यांनी विधेयकाच्या विरोधात आंदोलन करणार असल्याचे स्पष्ट केले होते.

शेट्टी म्हणाले, केंद्र शासनाने बहुमताच्या जोरावर ही विधेयके मंजूर केली आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद येणार असल्याचा दावा केला, जात आहे. पण हे पूर्णतः सत्य नाही. बाजार समिती हे राजकीय अड्डे बनलेले असल्याच्या शरद जोशी यांच्या भूमिकेशी मी सहमत आहे. विद्यमान व्यवस्थेला छेद देण्याचा प्रयत्न केंद्र शासनाकडून होत असेल तर ती स्वागतार्ह गोष्ट आहे. तथापी शेतकऱ्यांना खाजगी कंपन्यांकडून हमीभाव मिळणार असेल तर त्याला विरोध असण्याचे कारण नाही. त्यामुळे केंद्र शासनाने अगोदर हमीभाव कायदा मंजूर करावा, अशी मागणी शेट्टी यांनी केली.

हमीभाव मंजूर झाला पाहिजे, याकरिता आपण देशातील २६० शेतकरी संघटनांना आणि एकवीस राजकीय पक्षांना एकत्र करून पाठिंबा दिला होता. मात्र, हा कायदा मंजूर झाला नाही. हमीभाव मिळाला तर शेतमालाला एक शाश्वती लाभणार आहे. शेतमालाचा हमीभावाचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे नोंद होतील, अशी तरतूद मी संसदेत २०१८ साली मांडलेल्या विधेयकात होती. तो हमीभाव कायदा मंजूर केला असता तर शेतकऱ्यांना न्याय मिळाला असता, असा दावा शेट्टी यांनी केला.