येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व गोकुळ शिरगांव पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी पहाटे उजळाईवाडी गावच्या हद्दीतील ७ अवैध दारुअड्डे जेसीबी मशिनच्या सहाय्याने उद्ध्वस्त केले. या प्रकरणी सात आरोपींना अटक केले असून दारू तयार करण्याच्या पाण्याच्या टाक्या, जमिनीत पुरलेल्या दारू रसायनाच्या टाक्या, चुलीवरील दारू तयार करण्याचे १५ बॅरेल तसेच पक्क्या रसायनाचे १५ बॅरेल हे जेसीबीच्या सहाय्याने फोडून जमिनीखाली गाढून नष्ट करण्यात आले.
पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे व अप्पर पोलीस अधीक्षक चतन्या एस. यांच्या मार्गदर्शनानुसार नववर्ष आगमनाच्या पाश्र्वभूमीवर गावठी हातभट्टी दारू, अवैध दारू वाहतूक यांना प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने छापा टाकून कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी विविध पथके तयार करून पहाटे ५ वाजता ५ पोलीस अधिकारी व ३० पोलीस कर्मचारी तसेच गोकुळ शिरगांव पोलीस ठाण्याचे २ अधिकारी, १० पोलीस कर्मचारी यांच्या पथकाद्वारे ही कारवाई केली. उजळाईवाडी गावच्या हद्दीतील कंजारभाट वसाहत येथे छापा टाकून टेकडीच्या आडोशास तसेच झोपडपट्टीच्या आडोशास छुप्या पध्दतीने चालू असलेल्या गावठी हातभट्टी, दारू तयार करण्याच्या भट्टय़ा जेसीबी मशिनच्या सहाय्याने उद्ध्वस्त केल्या. हातभट्टय़ा चालवणारे उजळाईवाडीचे ग्रा.पं.सदस्य मोहन मछले, नितीन गागडे, शागीर्द तमायचे, विष्णू गुमाणे, काíतक गागडे, गोपाळ अभंगे व कृष्णा गुमाणे यांना अटक करण्यात आली. छापा कारवाई करून ७०० लिटर गावठी हातभट्टीची दारू, ३ हजार लिटर रसायन, ७ किलो गूळ असा ६८ हजार रुपयांचा माल जप्त करून तो नष्ट करण्यात आला.