सर्व ऑक्सिजन उत्पादन केवळ वैद्यकीय उपयोगासाठी आरक्षित

दयानंद लिपारे, लोकसत्ता

कोल्हापूर : करोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत कोल्हापुरातील सर्व ‘ऑक्सिजन’ उत्पादक कंपन्यांना त्यांच्याकडे तयार होणारा ‘कृत्रिम प्राणवायू’ यापुढे केवळ वैद्यकीय उपयोगासाठी आरक्षित ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले. मात्र यामुळे औद्योगिक क्षेत्राला होणारा ‘ऑक्सिजन’चा पुरवठा खंडित होणार आहे. यामुळे कोल्हापुरातील प्रामुख्याने फौंड्री, इंजिनीअरिंग या मुख्य उद्योग घटकाचे औद्योगिक चक्र ठप्प होण्याची चिन्हे आहेत.

कोल्हापूर जिल्ह्य़ामध्ये करोना रुग्णसंख्या १५ हजारांपर्यंत गेली आहे. आतापर्यंत ४४० लोकांचा मृत्यू झाला. काही रुग्णांना ‘ऑक्सिजन’ची गरज भासत आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने छत्रपती प्रमिलाराजे जिल्हा रुग्णालयामध्ये (सीपीआर) २० हजार लिटरची टाकी बसवली. यातून दररोज ४५० रुग्णांना पुरेल इतका ऑक्सिजन मिळतो. जिल्ह्य़ातील अन्य रुग्णालयांमध्येही ऑक्सिजनची गरज आहे. तरीही कृत्रिम प्राणवायूचा पुरवठा पुरेसा नाही. ही गोष्ट  लक्षात घेऊन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्ह्य़ात ‘ऑक्सिजन’चे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना त्यांचे उत्पादन यापुढे केवळ वैद्यकीय उपयोगासाठी आरक्षित ठेवण्याचे आदेश दिले.

जिल्ह्य़ात कोल्हापूर ऑक्सिजन (कागल), नायट्रोजन प्रायव्हेट लिमिटेड (शिरोली), महालक्ष्मी गॅस (इचलकरंजी), देवी इंडस्ट्रियल गॅस (गोकुळ शिरगाव) आणि चंद्र उद्योग (शिरोली) या पाच कंपन्यांमध्ये ‘ऑक्सिजन’ची निर्मिती केली जाते. कोल्हापुरात तयार होणारा ‘ऑक्सिजन’ हा औद्योगिक क्षेत्रात वापरला जातो. जिल्ह्य़ातील फौंड्री, इंजिनीअरिंग उद्योगात याची मोठी मागणी आहे. परंतु आता या उद्योगाकडील हा ‘ऑक्सिजन’ पुरवठा थांबवण्यात आल्याने या उद्योगाची चाके थांबली आहेत.

अडचण काय?

कोल्हापूरमध्ये कृत्रिम ऑक्सिजनची निर्मिती करणाऱ्या पाच कंपन्या आहेत. तेथे तयार होणारा हा ‘ऑक्सिजन’ औद्योगिक प्रकल्पांसाठी वापरला जातो. परंतु आता जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढल्याने त्यांनी त्यांचे उत्पादन हे केवळ वैद्यकीय वापराकडे वळवल्याने त्यांचे खरेदीदार उद्योगाची चाके थांबली आहेत.

कोल्हापूर जिल्ह्य़ात करोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत ‘ऑक्सिजन’ची निर्मिती करणाऱ्या सर्व उद्योगांनी त्यांचे उत्पादन हे पुढील आदेश येईपर्यंत केवळ वैद्यकीय उपयोगासाठी आरक्षित ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.  – दौलत देसाई,  जिल्हाधिकारी, कोल्हापूर