महापालिका निवडणुका नजरेसमोर ठेवून पक्षाच्या पुनर्बाधणीसाठी सांगलीसह मिरज तालुक्यातील शिवसेनेची सर्व पदे बरखास्त करण्यात आली असल्याचे जिल्हा संपर्कप्रमुख नितीन बानुगडे यांनी जाहीर केले. नवीन पदाधिकारी निवडत असताना समन्वय समिती स्थानिक कायकर्त्यांशी संवाद साधून निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शिवसेना विस्ताराला सांगली महापालिका क्षेत्रात मर्यादा येत असल्याचे लक्षात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. पक्षाचा जिल्हा स्तरावर अधिक पाया भक्कम करण्यासाठी प्रा.बानुगडे यांनी तालुका स्तरावर बठक घेण्यास प्रारंभ केला. कडेगाव येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या बठकीत सांगली व मिरज शहरात पक्षाचा कार्यक्रम तळागाळापर्यंत पोहोचत नसल्याचे दिसून आल्याचे त्यांनी सांगत महापालिका क्षेत्रासह मिरज तालुक्यातील पदे बरखास्त करण्यात येत असल्याचे जाहीर केले.
येत्या महिन्यात समन्वय समितीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन नवीन पदाधिकारी निवडण्यात येतील. या कालावधीत कोणीही आपल्या पदाचा अथवा लेटरहेडचा वापर करू नये, असे आदेशही त्यांनी जिल्हा प्रमुख आनंदराव पवार यांना लेखी पत्राद्बारे दिला आहे. मध्यवर्ती शिवसेनेसह संलग्न असलेले वाहतूक सेना, शिव उद्योग व सहकार सेना, माथाडी सेना, रेल्वे प्रवासी सेना, व्यापारी सेना, सुरक्षा रक्षक कामगार सेना, शिक्षक सेना या विभागातील पदाधिकारी बरखास्त करण्यात आले आहेत.