राज्यात मुख्यमंत्री सडक योजनेच्या माध्यमातून रस्ते विकासाचा भरीव कार्यक्रम हाती घेतला असून, यासाठी १ हजार कोटीची तरतूद करून दोन वर्षांत सर्व रस्ते चकाचक केले जाणार आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पात यासाठी ३४३ कोटीची तरतूद केली असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी दिली.
महाराजस्व अभियानांतर्गत भुदरगड तालुक्यातील खानापूर येथे आयोजित केलेल्या विस्तारित समाधान योजना शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
राज्यातील शासन सामान्य माणसाचे हित जोपासणारे शासन असल्याचे स्पष्ट करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जनतेच्या आशाआकांक्षा पूर्ण करण्याचा निर्धार शासनाने केला असून, छत्रपती शिवाजीमहाराज आणि राजर्षी शाहूमहाराजांच्या विचारानुसार काम करण्यास शासनाने प्राधान्य दिले आहे. राज्यातील शेती, पिण्याचे पाणी यासाठी जलयुक्त शिवार अभियान हाती घेऊन गावागावांत पाणीसाठे निर्माण करण्यास प्राधान्य दिल्याचे ते म्हणाले.
पाटील म्हणाले, खानापूर ग्रामपंचायतीने स्वच्छतेचा हाती घेतलेला उपक्रम कौतुकास पात्र आहे. या गावाने कचऱ्याचे विलगीकरण करून सुक्या कचऱ्यापासून पांढरा कोळसा आणि ओल्या कचऱ्यापासून खत आणि वीजनिर्मिती करण्यात पुढाकार घ्यावा, या प्रस्तावास आवश्यक ती मदत केली जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी तहसीलदार शिल्पा ओसवाल यांनी सुवर्ण महाराजस्व अभियानाबाबत माहिती दिली. या वेळी गावकऱ्यांना विविध प्रकारचे दाखले, विविध योजनांतील, अनुदानातील धनादेश व वस्तूंचे वाटपही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.