News Flash

‘गोकुळ’च्या रणांगणावर आरोप-प्रत्यारोपांना धार

जिल्ह््यातील तीन मंत्री आणि महाडिक परिवाराच्या अस्तित्वाची निवडणूक

(संग्रहित छायाचित्र)

दयानंद लिपारे

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ)च्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी पंधरवड्याचा अवकाश आहे. आतापासूनच सत्ताधारी आणि विरोधी गटाच्या बड्या नेत्यांना नाराज, बंडखोर यांची मनधरणी करावी लागत आहे. दोन्ही गटांनी प्रचार यंत्रणा सतर्क केली असून पहिल्या टप्प्यात आरोप-प्रत्यारोपांची उडालेली राळ पाहता त्याला आणखी धार चढण्याची लक्षणे आहेत. जिल्ह््यातील तीन मंत्री आणि महाडिक परिवार यांच्या अस्तित्वाची निवडणूक असल्याने साऱ्यांनीच सारी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

गोकुळचा संचालक होण्यासाठी इच्छुक नाही असा जिल्ह््यातील पहिल्या, दुसऱ्या फळीतील एकही नेता शोधून सापडणार नाही. गोकुळच्या ‘मलईदार’ कारभाराची चवच न्यारी. स्वाभाविकत: तीत सहभागी होण्याची ओढ सर्वांनाच लागल्याने जिल्ह््यातील राजकारण ढवळून निघाले आहे. निवडणुकीसाठी ४८२ अर्ज सादर झाले आहेत.  सत्ताधारी गटाचे नेते आमदार पी. एन. पाटील, महादेवराव महाडिक, माजी अध्यक्ष अरुण नरके यांनी, तर विरोधी गटाकडून पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक यांनी संभाव्य उमेदवारांची नावे निश्चित करून प्रचाराला लागण्याचा कानमंत्रही दिला आहे. अशांनी उन्हाच्या झळामध्ये प्रचाराला आरंभ केला आहे. यावर अन्य इच्छुकांनी ‘उमेदवारी दिलीच पाहिजे, अन्यथा…’ असे म्हणत बंडाचे निशाण रोवल्याने उभय गटांतील नेत्यांची भलतीच पंचाईत झाली आहे.

बेरजेचे राजकारण

नाराजी दूर करतानाच बेरजेच्या राजकारणावर भर दिला आहे. बड्या नेत्यांना आपल्या छावणीत सामावून घेतले जात आहे. निवडणूक अत्यंत चुरशीची असल्याने प्रत्येक मत मिळावे यासाठी आटापिटा सुरू आहे. ठरावधारकाच्या नेत्यांना आपल्याकडे सामावून घेतले की पाठोपाठ त्यांना मानणारी मते मिळतात, अशी राजकीय व्यूहरचना आहे. यासाठी नेत्यांनी तालुक्याचा दौरा सुरू केला आहे. सध्या तरी विरोधी राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीचे नेते ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी आघाडी घेतली आहे. या दोघांनी कुपेकर, आवळे, आवाडे या माजी मंत्र्यांसह शिरोळ तालुक्यातील सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी खासदार राजू शेट्टी, दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. या मातबर घराण्यांनी आघाडीला पाठिंबा दिल्याचा दावा मंत्र्यांनी केला आहे. सत्ताधारी गटाचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, राजू शेट्टी यांची भेट घेऊन पाठबळ मिळवण्याची संधी साधली. पी. एन. पाटील यांनी तूर्त यंत्रणा सक्रिय करीत ठरावधारकांना ओढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

आव्हान आणि अपेक्षांची कोंडी

प्रत्येक नाराज नेत्यांना दोन जागा हव्या आहेत. बारा तालुके आणि २१ जागा यातून प्रत्येकाचे समाधान कसे करायचे. याच वेळी आपल्या घराण्यातील उमेदवारी सुरक्षित कशी ठेवायची याचा घोर दोन्ही आघाडींतील नेत्यांना लागला आहे. प्रचार सुरू असताना ठरावधारक साडेतीन हजारांवर प्रतिनिधींना खूश करण्यासाठी ‘लाख’मोलाची मदतही देऊ केली जात असल्याने निवडणुकीला चांगलाच ‘अर्थ’ प्राप्त होण्याचे संकेत आहेत. दुसरीकडे, संपर्क अभियानाच्या माध्यमातून प्रतिस्पध्र्यांवर निशाणा साधला जात आहे. महाडिक यांनी ‘गोकुळ दूध संघ विरोधकांच्या ताब्यात गेला तर ते संस्था बुडवतील’, अशी टीका केली आहे. मंत्री मुश्रीफ यांनी ‘कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने देशात सर्वाधिक नफा मिळवून यशाचे लखलखीत उदाहरण घालून दिले आहे’, असे प्रत्युत्तर दिले. आरोप-प्रत्यारोपांची धार आणखी तीक्ष्ण होईल.

दोन अपक्ष आमदार; दोन तºहा

गोकुळची निवडणूक महा विकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. सत्ताधारी गटाने पक्षीय बंधन न ठेवता सर्वांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. अशा स्थितीत राज्यात भाजपला पाठिंबा दिलेल्या दोन अपक्ष आमदारांच्या दोन तºहा दिसत आहेत. पन्हाळ्याचे जनसुराज्यचे आमदार विनय कोरे यांनी ‘राज्यात भाजपला तर जिल्ह््यात आघाडीला पाठिंबा राहील’ अशी सोयीची भूमिका घेतली आहे. आमदार आवडे यांची सत्तारूढ व विरोधी दोन्ही गटांच्या नेत्यांनी भेट घेतल्यानंतर पाठिंबा असल्याचा दावा केला. आवाडे यांनी तिसरी आघाडी उभी करणार असल्याचे म्हणत आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2021 12:23 am

Web Title: allegations against gokul battlefield abn 97
Next Stories
1 गोकुळच्या निवडणुकीत रुसवे-फुगवेच अधिक
2 यंदाचा साखर हंगाम संमिश्र
3 ‘गेट’ परीक्षेत इचलकरंजीची अश्विनी कणेकर पहिली
Just Now!
X