नियमाप्रमाणे महापौरपदाची मुदत ही अडीच वर्षे असते. कोल्हापुरात मात्र या मानाच्या पदाची लक्तरे वेशीवर टांगली जात आहेत. चार — सहा महिन्यांसाठी महापौर निवडीची कुप्रथा आताही सुरु राहण्याची चिन्हे आहेत. महापौरांनी  राजीनामा दिल्यानंतर महापालिकेत काँग्रेस— राष्ट्रवादी या सत्ताधारी पक्षाकडून नवा महापौर निवडण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. स्पर्धेतील नागरसेविकांचे समाधान करण्यासाठी चक्क तीन-तीन  महिन्यासाठी महापौरपदाची संधी देण्याचा प्रस्ताव आहे. जुन्या सत्ताधीशांनी सुरु केलेली पद्धत मोडून काढणार असे सांगून सत्तेवर आलेल्या काँग्रेस— राष्ट्रवादीकडून तोच महापौरपदाची अप्रतिष्ठा करणारा पायंडा सुरु राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महापौरांची निवड झाली, की त्यांच्याकडून अडीच वर्षांंमध्ये नगरीच्या विकासकामांना न्याय मिळेल, असे गृहीत धरले आहे. पण, हा शासनाचा न्याय कोल्हापूरकरांना मुळीच मान्य नाही. त्यातूनच गेली १९ वर्षे कोल्हापुरात महापौरपदाची खुलेआम अप्रतिष्ठा होऊ  लागली आहे. ‘महापौरपदाची खांडोळी’ हा शब्द कोल्हापूर महापालिकेच्या राजकारणात चांगलाच अंगवळणी पडला आहे. त्याला कालचे आणि आजचे सत्ताधारी मुळीच अपवाद ठरलेले नाहीत. स्थायी समिती सभापती निवडीलाही याची लागण झाली आहे.

काँग्रेस— राष्ट्रवादीकडूनही खांडोळीच

महापौर सरिता मोरे यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीकडे सूरमंजिरी लाटकर आणि माधुरी गवंडी या दोन्ही नगरसेविकांची नावे आघाडीवर आहेत. महापालिकेत काँग्रेस— राष्ट्रवादीची सत्ता आहे. महापौर, उपमहापौर दरवर्षी आलटून पालटून घेण्याचा निर्णय उभय काँग्रेसने घेतला आहे. काँग्रेसचा महापौर निवडताना आमदार सतेज पाटील यांचा शब्द प्रमाण असतो, तर राष्ट्रवादीचा निवडताना आमदार हसन मुश्रीफ यांच्या शब्दाला महत्त्व आहे. आता वेळ राष्ट्रवादीची आहे. समोर आलेली लाटकर— गवंडी ही दोन्ही नावे ताकदीची आहेत. हाती कालावधी सहा महिन्याचा आहे. या उर्वरित काळात दोघांनाही तीन महिने महापौरपद देण्याचा प्रस्ताव आहे. वास्तविक, महापालिकेत माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी २००१ साली महापौरपदाची पहिली खांडोळी केली. त्यांच्याकडे सत्तासूत्रे होती तोवर हीच कुप्रथा नांदत होती. या प्रकारचा बीमोड करून महापालिकेची सत्ता मुश्रीफ — पाटील यांनी हिमतीने  मिळवली असली, तरी पूर्णवेळचा महापौर करण्याची हिंमत त्यांनी अद्याप दाखवली नाही. त्यांच्या काळातही सत्तास्थानाला धोका उद्भवू नये आणि सर्वाना संधी मिळावी या हेतूने जुना कित्ता गिरवला जात आहे. काँग्रेस— राष्ट्रवादीनेही सत्तेबाबत आपलेही पाय मातीचेच असल्याचे दाखवून दिले आहे.

विरोधकांकडून शह ?

महापालिकेच्या राजकारणात सत्ताधारी काँग्रेस— राष्ट्रवादीमध्ये सारे काही आलबेल आहे अशातला भाग नाही. त्यातूनच, गेल्या वेळी स्थायी समिती निवडीत भाजपने बाजी मारली होती. राष्ट्रवादीच्या फुटीर दोघा नगरसेवकांना पद गमवावे लागले, हा भाग अलाहिदा. मात्र, यातून सत्ताधारम्य़ांची धुसफूस आणि पदांचा हव्यास याचे दर्शन घडले. हीच बाब विरोधकांच्या पथ्यावर पडणारी आहे. महापौरपदासाठी स्मिता माने या प्रभावी नागरसेविकेला उतरवले जाणार आहे. त्यासाठी भाजप आणि ताराराणी आघाडी यांनी गनिमी कावा सुरु केला आहे. त्याला लोकसभा निवडणुकीची समीकरणे जोडली गेली असल्याने डाव — प्रतिडाव  महापौर निवडीला खेळले जात आहेत