दयानंद लिपारे

विधान परिषद निवडणुकीमध्ये यश मिळाल्यानंतर आता राज्यातील सत्तारूढ महाविकास आघाडीच्या सत्तेतील प्रमुखांकडे महामंडळांवर वर्णी लागावी यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्य़ातील तिन्ही मंत्र्यांनी तसेच पक्षाच्या वरिष्ठांनी आपल्या समर्थकांना महामंडळावर वर्णी लावण्याचा शब्द दिला होता. त्यामुळे आता इच्छुकांनी वरिष्ठ पातळीवर महामंडळात संधी मिळावी यासाठी कंबर कसली आहे.

आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले असल्याने आघाडी भक्कम असल्याचा दावाही केला जात आहे. सरकार स्थिर असल्याची खात्री पटल्याने कार्यकर्त्यांमध्येही आत्मविश्वास आहे. त्यातून कोल्हापूर जिल्ह्य़ात माजी आमदारांनी निवडणूक लढवलेल्या परंतु पराभूत झालेल्या उमेदवारांनी तसेच दुसऱ्या फळीतील प्रमुखांनी महामंडळावर अध्यक्ष, संचालक पद मिळावे यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

गतानुभव अन् लगबग

या नियुक्ती करताना विलंब न करता लवकर संधी दिली जावी. काम करण्यास पुरेसा अवकाश मिळेल अशी अपेक्षाही या इच्छुकांकडून व्यक्त होत आहे. राज्यात मागील वेळी भाजप-शिवसेना युतीचे सरकार असताना अंतर्गत वादातून महामंडळाचे अध्यक्ष आणि सदस्य निवडी रेंगाळल्या होत्या. महामंडळाचे गाजर दाखवून भाजपात प्रवेश केलेले, पद मिळण्याच्या अपेक्षेने प्रतीक्षा करीत होते. त्यांच्यामध्ये कोणत्या पक्षाला किती जागा द्यायच्या याचे सूत्र निश्चित होत नव्हते. बऱ्याच निवडी शेवटच्या सहा महिन्यांत जाहीर झाल्या. महापूर, लोकसभा निवडणूक अशा महत्त्वाच्या घटना घडल्याने यांना महामंडळामध्ये पुरेशी काम करण्याची संधी मिळाली नव्हती. पद मिळूनही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. हा अनुभव जमेला धरून आता महाविकास आघाडीच्या इच्छुकांनी नेत्यांकडे तातडीने महामंडळांच्या नियुक्त्या केल्या जाव्या असा लकडा लावला आहे. जिल्ह्य़ात काँग्रेसचे पालकमंत्री सतेज पाटील, राष्ट्रवादीचे नेते व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, शिवसेनेचे नेते व सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडे इच्छुकांनी नियुक्तीसाठी आग्रह धरला आहे.

 इच्छुकांची रांग

नुकत्याच झालेल्या पदवीधर मतदारसंघासाठी राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांचे समर्थक प्रताप ऊर्फ भैय्या माने यांनी उमेदवारी अर्ज भरला होता.  माने यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील यांना राज्य पातळीवर संधी दिली जाणार असल्याचे मुश्रीफ यांनी जाहीर केले. राष्ट्रवादीत आणखीही प्रमुख महामंडळांच्या संचालक पदासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. शिवसेनेत मध्ये तर मोठी चुरस आणि शह-काटशह पाहायला मिळाली. मुख्यमंत्रीच शिवसेनेचे असल्याने शिवसैनिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. विधानसभेला शिवसेनेचे पाच आमदार पराभूत झाले होते. या सर्वानी आता महामंडळांसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. एकमेव आमदार प्रकाश आबिटकर यांनी मंत्रिपद मिळाले नसले तरी महत्त्वाचे महामंडळ मिळाले पाहिजे असा हट्ट धरला आहे. अण्णासाहेब पाटील मराठा महामंडळ बरखास्त करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याचे उपाध्यक्षपद कोल्हापूरचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्याकडे होते.

दोन वर्ष या मंडळाचे काम प्रभावी केले असल्याने मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे अध्यक्षपद मिळावे यासाठी आपण आग्रही असल्याचे त्यांनी सांगितले. याच महामंडळावर राष्ट्रवादीचे ए. वाय.पाटील हेही इच्छुक असले तरी त्यांनी पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारणार असल्याचे ते सांगितले. काँग्रेसमध्येही कित्येकांनी याचसाठी संपर्क वाढवला आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांनी ‘याबाबत काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या पक्षांच्या प्रमुखांच्या समितीकडून निर्णय घेतला जाऊन योग्य त्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे,’ असे सांगितले.

तांत्रिक अडचणींची शक्यता

* करवीर निवासिनी महालक्ष्मी, दखनचा राजा ज्योतिबा यांसह तीन हजारांवर देवस्थानांचा समावेश असलेले पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त केली जाणार असल्याची चर्चा आहे.

* सध्या या समितीच्या अध्यक्षपदी भाजपचे महेश जाधव आहेत. त्यांनी ‘आपली निवड राज्यपालांनी पाच वर्षांसाठी केली आहे.

* देवस्थान मंडळ बरखास्त करण्याच्या हालचाली बाबत आपल्याला काहीच माहिती नाही,’ असे स्पष्ट करतानाच युतीचे सरकार असताना काँग्रेस व राष्ट्रवादीच्या संचालकांना आम्ही कायम ठेवले होते, याकडे लक्ष वेधतात.

* त्यामुळे हे मंडळ बरखास्त केले जाणार का किंवा तेथे राज्य शासनाच्या अधिकारात नवीन अध्यक्ष, संचालक निवडले जाणार का हेही लक्षवेधी बनले आहे.

* या देवस्थानासाठी सतेज पाटील यांचे बंधू डॉ. संजय डी. पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. येथे संचालकपद मिळवण्यासाठी काहींचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

* त्यामुळे महामंडळांची नियुक्तीची इच्छुकांची संख्या आणि वाढत्या अपेक्षा पाहता महाविकास आघाडीच्या नेत्यांची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत.