दयानंद लिपारे

सूत दरवाढीमुळे गेले सहा महिने वस्त्रोद्योगात अस्वस्थता निर्माण झाली होती. आता सुताचे दर घसरणीला लागले असल्याने नवी चिंता वाढली आहे. कापडाचे दर कमी होत मागणी घटली आहे. करोनाचे संकट पुन्हा वाढल्याने कच्चा माल मिळणे, उत्पादन, साठवण, विक्री, आर्थिक टंचाई अशा नानाविध कारणांमुळे वस्त्रोद्योग क्षेत्र पुन्हा अनिश्चिाततेच्या फे ऱ्यात अडकले आहे.

वस्त्रोद्योगाचा आर्थिक हंगाम दिवाळी पाडव्याला सुरू होतो. त्याच्या आसपास सूत दरामध्ये वाढ होऊ लागली होती. डिसेंबरपर्यंत त्यात दहा टक्के वाढ झाली होती. तर मार्चअखेरपर्यंत आणखी २५ ते ३० टक्के भर पडली होती. दरवाढीचा वाढता आलेख पाहता सुताची खरेदी करणे यंत्रमागधारकांच्या आवाक्याबाहेर गेले होते. १९९६-९८ साली सूतदरात प्रचंड वाढ झाली होती. त्यातून देशव्यापी आंदोलन उभे राहिले होते. त्यापेक्षा यंदाची वाढ अधिक होती. परिणामी देशातील अनेक यंत्रमाग केंद्रांत उत्पादन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सुताचे दर गगनाला भिडत असताना कापड विक्री मात्र जेमतेम दराने होत राहिल्याने यंत्रमागधारकांना आर्थिक फटका सहन करावा लागला होता. कापसाच्या दरांमध्ये वाढ होत असल्यामुळे सूतदर वाढत चालले असल्याचे कारण व्यापारी देत होते. मात्र काही यंत्रमागधारकांच्या मते ही कृत्रिम दरवाढ होती. यातून व्यापारी नफेखोरी करून बक्कळ कमाई करीत असल्याचा आरोपही होत होता. ही बाब यंत्रमागधारकांच्या संघटनांनी निदर्शनास आणून दिल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात झालेल्या एका बैठकीत चौकशीचे आदेश दिले.

मार्च नंतर कलाटणी

आर्थिक वर्ष संपल्यानंतर वस्त्रोद्योगाची परिस्थिती आमूलाग्र बदललेली पाहायला मिळत आहे. कापसाच्या वाढत चाललेल्या दराला लगाम बसला आहे. ४७ रुपये प्रति खंडी असणारा उत्तम दर्जाचा कापूस आठवड्यात ४५ हजार रुपये प्रति खंडी इतका कमी झाला आहे. याचा परिणाम सूतदरावर दिसू लागला आहे. सुताच्या दरवाढीला सहा माहिन्यांत प्रथमच ब्रेक बसला आहे. ३२, ४३ काउंटचे उत्तम दर्जाचे सूत १३५० रुपये होते ते गेल्या आठ दिवसांमध्ये १२७५ रुपये इतके कमी झाले आहेत. अन्य प्रकारच्या सुतामध्येही घसरण होऊ लागले आहे. सूत दर कमी होत असले तरी त्याचा आनंद घेण्यासाठी अवधीसुद्धा मिळाला नाही. याला कापडाच्या दरातील घसरण हे कारण सांगितले जात आहे. दुसरीकडे कापडाची मागणी घटली आहे. देशातील मोठ्या बाजारपेठांमध्ये करोनाचे सावट जाणवत आहे. तेथून होणारी कापसाची मागणी घटत चालली आहे. स्थानिक बाजारपेठेवर, विकेंद्रित क्षेत्रातील यंत्रमाग व्यवसायावर त्याचा परिणाम होत चालला आहे.

मोठ्या प्रमाणात आर्थिक चणचण भासत आहे. एका घटकाकडून दुसऱ्या घटकाकडे मालाच्या खरेदीचे पैसे हस्तांतर होण्यास विलंब लागत आहे. देयके वेळेवर मिळत नसल्याने अन्य घटकांची देयके देण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. तर दुसरीकडे, करोनाची तीव्रता वाढत असल्याने भिवंडी, मालेगाव, नागपूर, इचलकरंजी, सांगली येथील परप्रांतीय कामगार गावी परतू लागल्याने उत्पादन निर्मितीवर परिणाम जाणवू लागला आहे.

कापूस व सूतदरामध्ये घट होत आहे. याचा यंत्रमाग व्यवसायावर परिणाम होत असल्याचे यंत्रमागधारक सांगत आहेत. यापूर्वी दरवाढीमुळे चिंता निर्माण झाली होती, आता दर घसरणीला झाल्याने नवे प्रश्न निर्माण झाले आहेत.

– आमदार प्रकाश आवाडे, माजी वस्त्रोद्योगमंत्री

वस्त्रोद्योगाच्या परिस्थितीचे आकलन करणे अशक्य बनत चालले आहे. कधी दर मोठ्या प्रमाणात वाढत जातात तर कधी त्यामध्ये लक्षणीय प्रमाणात घसरण होते. अशा स्थितीत करोना संसर्गाचे आव्हान गडद होत चालले असल्याने व्यवहार करणे वस्त्र उद्योगांना अडचणीचे बनले आहे. कापूस दरात प्रति खंडी दोन ते तीन हजार रुपये घसरण झाली असताना गेल्या दोन दिवसांच्या आत पुन्हा वाढ होत चालली असल्याने वस्त्रोद्योगातील गुंतागुंत अधिकच वाढीस लागली आहे.

– अशोक स्वामी, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघ