कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकातील सीमोल्लंघन सोहळा किमान गर्दीमध्ये होणार असल्याचे संकेत जिल्हाधिकारी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी दिले. मात्र, करवीरनिवासिनी महालक्ष्मी मंदिरात होणाऱ्या नवरात्र सोहळ्याबाबत त्यांच्याकडून स्पष्टीकरण झाले नसल्याने अद्याप संदिग्धता कायम आहे.

कोल्हापुरात नवरात्रोत्सव दरवर्षी उत्साहात साजरा केला जातो. करवीरनिवासिनी महालक्ष्मी मंदिरात दररोज वेगवेगळ्या रूपातील पूजा बांधली जाते. तसेच अन्य विधीही उत्साहात होत असतात. ललिता पंचमीला करवीर निवासिनी व त्र्यंबोली देवीच्या भेटीचा सोहळाही भाविकांच्या अमाप उत्साहात पार पडतो. नवरात्र सोहळा करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन परवानगी मागितली आहे. याबाबत अद्याप कसलाही निर्णय घेण्यात आला नाही.

दरम्यान,  जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी नवरात्र उत्सव आणि दसरा साधेपणाने साजरा करावा असे आवाहन केले आहे. १७ ऑक्टोबरपासून नवरात्र सुरू होणार असून २५ ऑक्टोबर रोजी दसरा आहे. दसरा चौकात विजयादशमी दिनी पारंपरिक उत्सवासाठी कमीत कमी गर्दी असावी, असे आवाहन देसाई यांनी केले आहे. तसेच, एकूण नवरात्र उत्सव सोहळा साजरा करताना आवाक्यात आलेली करोना बाधितांची संख्या वाढणार नाही याची काळजी घेण्यासाठी सामाजिक अंतर, मुखपट्टी, निर्जंतुकीकरण याचा वापर करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.