कोल्हापुरात दूधसंकलन; उत्पादकांना एक रुपया तर ग्राहकांना ३ रुपयांची सवलत

देशातील सर्वात मोठा दूध संघ असलेल्या ‘अमूल’ने कोल्हापूर जिल्ह्यात दूध संकलनाला सुरुवात केली आहे. या संकलनावेळी अन्य दूध संघांच्या तुलनेत खरेदीवेळी उत्पादकांना प्रतिलीटर एक रुपया अधिक दर, तर विक्रीवेळी ग्राहकांना ३ रुपये स्वस्त दर देण्याचे धोरण ‘अमूल’ने जाहीर केल्याने कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील दूधधंद्यावर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर जिल्हा हा दूध उत्पादनासाठी देशभरात ओळखला जातो. येथील दुधाची चव आणि दर्जा उत्तम असल्याने राज्यभरातून येथील दुधाला मोठी मागणी असते, मात्र त्या तुलनेत दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळत नसल्याची सर्वत्र ओरड सुरू असते. या पाश्र्वभूमीवर ‘अमूल’ने कोल्हापुरात शिरकाव केल्याने या उद्योगात मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे.

‘अमूल’ने कोल्हापूर जिल्हय़ातील शिरोळ, जयसिंगपूर येथे नुकतीच आपल्या दूध संकलनास सुरुवात केली आहे. शिरोळ तालुका हा कोल्हापूर, सांगली जिल्हा आणि कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यंच्या सीमेवरचा भाग आहे. वाहतुकीच्या दृष्टीने या तीनही जिल्ह्यंतील दूधसंकलन करणे सोयीचे होण्यासाठी शिरोळ या मध्यवर्ती केंद्राची निवड केल्याचे बोलले जात आहे. सध्या पन्नास हजार लीटरपेक्षा अधिक दूधसंकलनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात दूधसंकलन झाल्यानंतर उत्पादकांना आणखी सवलती दिल्या जाणार आहेत.

अमूलचे प्रभारी व्यवस्थापक जगदीश वाकोडे यांनी सांगितले, की ‘घाटगे फूड अँड मिल्क प्रॉडक्ट्स’ येथेही दूधसंकलन आणि पश्चात प्रक्रिया केली जाणार आहे. ‘अमूल’ने नेहमीच गुणवत्तापूर्ण आणि सकस दूधनिर्मितीकडे काटेकोर लक्ष पुरवले आहे. कोल्हापूर जिल्ह्यतही आमचा भर यावरच राहणार आहे.

उत्पादक आणि ग्राहक दोघांनाही फायदा

सध्या ‘अमूल’तर्फे दूध संकलनावेळी उत्पादकांना प्रतिलीटर एक रुपये जादा दर दिला जात आहे. त्याच वेळी संकलन केलेल्या या दुधाची विक्रीदेखील अन्य दूध संघांपेक्षा ३ रुपये स्वस्त दराने केली जात आहे. दूध उत्पादक आणि ग्राहक दोघांनाही फायदा वाटल्याने सध्या ते ‘अमूल’कडे आकृष्ट होऊ लागले आहेत. ‘अमूल’च्या कोल्हापुरातील प्रवेश आणि धोरणामुळे त्यांची अन्य दूध संघांबरोबर मोठी स्पर्धा निर्माण झाली असून त्यांच्यापुढे नवे आव्हान उभे ठाकले आहे. आता हे उर्वरित संघ काय भूमिका घेणार याकडे सगळय़ांचे लक्ष लागले आहे.