कोल्हापुरात आज मेळावा

कोल्हापूर : मंत्रिपद न मिळाल्याने कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाटय़ावर आला आहे. सलग चाळीस वर्ष काँग्रेसशी एकनिष्ठ राहूनही काँग्रेसचे प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आमदार पी. एन. पाटील सडोलीकर यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने पाटील यांच्या कार्यकर्त्यांतून संताप व्यक्त होत आहे. ही खदखद मांडण्यासाठी आणि पुढील दिशा ठरवण्यासाठी उद्या बुधवारी फुलेवाडी येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला असल्याची माहिती संयोजकांनी मंगळवारी दिली.

काँग्रेस पक्षाच्या अडचणीच्या काळात आमदार पाटील यांनी जिल्हाध्यक्षपदाची धुरा तब्बल वीस वर्ष सांभाळताना जिल्ह्य़ात पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवले. सहापैकी चार विधानसभा निवडणुकात पक्षातील काही नेत्यांनीच फंदफितुरी करून पाटील यांचा पराभव घडवून आणला. तरीही पाटील यांनी संयम पाळला होता. २००४ साली पाटील यांचे जिवलग मित्र विलासराव देशमुख मुख्यमंत्री असतानाही मंत्रिपदापासून पाटील यांना वंचित ठेवूनही पाटील यांनी पक्षावरील निष्ठा ढळू दिली नव्हती.

अन्य पक्षातून आलेली आमंत्रणे ठोकरून गांधी नेहरू घराणे व काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेल्या पाटील यांचे यंदा मंत्रिपद हमखास मिळणार याची कार्यकर्त्यांना खात्री होती. पाटील यांना मंत्रिपदापासून डावलल्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी बुधवारी फुलेवाडी येथे तातडीचा मेळावा बोलावला आहे. भोगावती साखर कारखान्याचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील कौलवकर, करवीरच्या सभापती अश्विनी धोत्रे, राधानगरी तालुका काँग्रेस अध्यक्ष हिंदुराव चौगले, करवीरचे अध्यक्ष शंकरराव पाटील, गोकुळचे काही संचालक आदींनी मेळाव्याचे आयोजन केले आहे.