News Flash

कोल्हापूरच्या अनिशा राजमानेला प्रतिष्ठेची कल्पना चावला शिष्यवृत्ती

कल्पना चावला शिष्यवृत्ती

करवीरकन्या अनिशा अशोक राजमाने हिला जगातील प्रतिष्ठेची अंतराळवीर कल्पना चावला शिष्यवृत्ती नुकतीच जाहीर झाली आहे. फ्रान्स येथील ‘इंटरनॅशनल स्पेस युनिव्हर्सिटी’तर्फे दिली जाणारी ही शिष्यवृत्ती अंतराळ संशोधनातील पदव्युत्तर शिक्षणासाठी आहे.

अभियांत्रिकी विषयातील पदवीधर असलेल्या अनिशाचे शिक्षण कोल्हापुरात झाले आहे. तिला अंतराळ संशोधनात रुची आहे. यासाठी तिने वरील शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला होता. जगभरातून केवळ एकाच मुलीला ही शिष्यवृत्ती दिली जाते. यामुळे ही निवड खूपच प्रतिष्ठेची मानली जाते. परंतु ही निवड प्रक्रिया खूप कस पाहणारी आहे. इच्छुक विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती अर्जासोबत या विषयावरील एक शोधनिबंध पाठवावा लागतो. जगभरातून आलेल्या हजारो अर्जदारांची शैक्षणिक गुणवत्ता आणि शोधनिबंधातील त्यांची शोधक वृत्ती याचा आढावा घेत एका विद्यार्थिनीची या शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते.

ही शिष्यवृत्ती महाराष्ट्राला सलग दुसऱ्या वर्षी मिळाली आहे. गेल्या वर्षी अमरावती येथील सोनल बाबेरवाल हिला ही शिष्यवृत्ती प्राप्त झाली होती. आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे अनिशा आणि सोनल या दोघींनाही ही शिष्यवृत्ती मिळवून देण्यात ‘नासा’शी संबंधित पुण्यातील लीना बोकील यांनी मार्गदर्शन केले आहे.

कल्पना चावला शिष्यवृत्ती

अंतराळात जाणारी भारतीय वंशाची पहिली महिला अंतराळवीर अशी कल्पना चावला यांची ओळख आहे. २००३ मध्ये अवकाशातून पृथ्वीवर परत येणाऱ्या कोलंबिया अवकाशयानाचा स्फोट होऊन चावला यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या अंतराळ संशोधन कार्याच्या स्मृती टिकून राहाव्यात यासाठी त्यांच्या नावे दरवर्षी जगभरातून एका तरुणीला ‘इंटरनॅशनल स्पेस युनिव्हर्सिटी’कडून ही शिष्यवृत्ती दिली जाते.

भारतीय अंतराळ संशोधनाचे लक्ष्य – अनिशा

ही निवड झाल्यावर अनिशाने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले की, कोल्हापूरसारख्या छोटय़ा शहरात या शिष्यवृत्तीविषयी फारशी माहिती नव्हती, पण लीना बोकील यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे मला तिथपर्यंत पोहोचता आले. पुढील दोन वर्षांत अंतराळ संशोधनाचा अभ्यास करण्याची मोठी संधी मिळणार आहे. अंतराळ संशोधनातील पदव्युत्तर पदवी (एम. एस.) मिळवल्यानंतर विदेशात न रमता भारतीय अंतराळ संशोधन क्षेत्रात काम करायला आवडेल असेही तिने सांगितले.

भारतीय युवकांना संधी – लीना बोकील

भारतातील हुशार विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या संधी मोठय़ा प्रमाणात उपलब्ध असल्याचे लीना बोकील यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, नासाशी माझा शैक्षणिक-संशोधन स्तरावरील संपर्क असल्याने अशा संधी कशा मिळवायच्या याबाबत मी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असते. अमेरिका-युरोपात पदवीनंतर नोकरीच्या संधी लगेचच उपलब्ध होत असल्याने तेथील युवक संशोधनाकडे फारसे वळत नाहीत. यामुळे या क्षेत्रात भारतीय युवकांना मोठी संधी असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2018 12:59 am

Web Title: anisha ashok rajmane get kalpana chawla scholarship
Next Stories
1 राज्याच्या अर्थसंकल्पावर विरोधकांची झोड
2 अभय कुरुंदकर, फळणीकरच्या घराची झडती
3 International Women’s Day 2018 महिला उद्योजकांचा टक्का वाढविण्यासाठी धोरण
Just Now!
X