राज्यातील टोलचा प्रश्न सोडविताना आठशे कोटींची तरतूद करणा-या राज्य शासनाने कोल्हापूरसाठी २५० कोटींची तरतूद केली असती, तर हा प्रश्नही सुटला असता. तथापि केवळ पश्चिम महाराष्ट्राला निधी जातो म्हणून प्रादेशिक मुद्दा करून हा प्रश्न रेंगाळत ठेवला आहे. महापालिकेसाठी मतांवर डोळा ठेवून कोल्हापूर टोल मुक्तीची घोषणा करण्यात आली असल्याचा घणाघाती आरोप, राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी येथे शनिवारी बोलताना केला.
आमदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणा-या गणराय अॅवॉर्ड वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. गणराय अॅवॉर्डसारख्या सांस्कृतिक कार्यक्रमा वेळीही राजकीय टीका-टिप्पणी होत राहिल्याने मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल झाली.
जयंत पाटील यांनी, मंडळांनी लोकशाही मार्गाने वर्गणी वसूल करावी, इतर पक्षांसारखी नको, असे म्हणत त्यांनी राजकीय पक्ष कोणत्या मार्गाने जातात यावरच बोट ठेवले. मागणी करूनही शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे दहावी व बारावीचे प्रमाणपत्र अद्याप बोर्डाने दिले नाही. मंत्री गिरीश बापट हे विद्यार्थ्यांसमोर ‘क्लिप’च्या विषयावर बोलतात. एवढय़ा खालच्या पातळीवर मंत्र्यांनी जावे हे शोभनीय नाही, असे म्हणत त्यांनी मंत्रिद्वयांवर टीका केली.
आमदार मुश्रीफ यांनी, कोल्हापुरात भाजपची सत्ता आल्यावर अंडी-मटण खाण्यावर बंदी येईल, अशी भीती व्यक्त केली. या वेळी राजू लाटकर यांचे भाषण झाले. प्रथम क्रमांकाच्या मंडळांना रोख एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यामध्ये सजीव देखावा- छत्रपती शिवाजी तरुण मंडळ, पाटील गल्ली कसबा बावडा, द्वितीय मित्रप्रेम मित्रमंडळ, ताराबाई रोड, तृतीय- उमेश खांडेकर भाऊ युवा मंच, रंकाळा. तांत्रिक देखावा- प्रथम विजेता तरुण मंडळ, रमण मळा कसबा बावडा, द्वितीय- नंदी तरुण मंडळ, ताराबाई रोड, तृतीय जय शिवराय मित्र मंडळ, उद्यमनगर. उत्कृष्ट सजावट- प्रथम राधाकृष्ण तरुण मंडळ, शाहूपुरी, द्वितीय रंकाळा वेश गोल सर्कल मित्र मंडळ, तृतीय दिलबहार तालीम मंडळ. शिस्तबद्ध मिरवणूक- प्रथम लेटेस्ट तरुण मंडळ, द्वितीय तुकाराम तालीम मंडळ, तृतीय छत्रपती संभाजी नगर तरुण मंडळ, संभाजीनगर.