इचलकरंजी शहरातील अतिक्रमण विरोधातील मोहीम मंगळवारी दुसऱ्या दिवशीही सुरूच होती. कारवाईवेळी काही फेरीवाल्यांनी विरोध केला. मात्र त्याला न जुमानता ही मोहीम सुरू होती. दरम्यान काही ठिकाणी अतिक्रमणविरोधी पथकाच्या कारवाईनंतर पुन्हा हातगाडे रस्त्यावर आल्याचे दिसल्याने कारवाईच्या गांभीर्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यामुळे प्रशासनाने अतिक्रमणाविरोधात कठोर भूमिका घेणे गरजेचे आहे.
इचलकरंजी शहरातील मुख्यमार्गाच्या दुतर्फा आणि मोक्याच्या ठिकाणी फेरीवाले, छोटे व्यापाऱ्यांनी बस्तान मांडले आहे. पादचाऱ्यांसाठी असलेले फुटपाथ चालण्यासाठी की फेरीवाल्यांसाठी अशी स्थिती काही ठिकाणी दिसून येते. त्यामुळे पादचारी रस्त्यावरूनच चालत असल्याने वाहतुकीला अडथळा होत आहे. याबाबत तक्रारी वाढल्या आहेत. पालिका प्रशासन या विरोधात मोहीम राबवण्यास सुरुवात केल्यावर राजकारण्यांचा हस्तक्षेप वाढत होता. त्यामुळे कारवाई थंडावत होती. मात्र विधानपरिषद निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर नगरसेवक सहलीवर गेल्याची संधी साधत प्रशासनाने सोमवारपासून अतिक्रमणविरोधी जोरदार मोहीम सुरू केली आहे. मंगळवारी शिवाजी पुतळा परिसरातील जलशुद्धीकरण केंद्रालगतचे अतिक्रमण काढताना हातगाडेवाले, फळ विक्रेत्यांनी विरोध करत शंखध्वनीही केला. मात्र त्यांना न जुमानता ही मोहीम सुरूच होती.
शिवाजी पुतळा ते कोल्हापूर नाक्यापर्यंत ही मोहीम राबवण्यात आली. मोहिमेदरम्यान हातगाडे, छोटय़ा व्यापाऱ्यांच्या छपऱ्या जप्त करण्यात आल्या. दरम्यान हे पथक कारवाई करत पुढे जात असताना पुन्हा काही हातगाडेवाले रस्त्यावर येताना दिसत होते. परिणामी प्रशासनाच्या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या कारवाईत मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ, अतिरीक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार, अतिक्रमणविरोधी पथकाचे शिवाजी जगताप, संपत चव्हाण यांच्यासह अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.