स्वाध्याय परिवाराची तीर्थयात्रा ही विकासाची असते. परमपूज्य दादांची तीच खरी शिकवण आहे. कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दरबारात कोणीही येऊ शकते, हेच या देवीचे खरे ऐश्वर्य आहे. म्हणूनच तिचे खरे नावही विश्वप्रिये असल्याचे प्रतिपादन स्वाध्याय परिवाराच्या दीदी व स्वर्गीय पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या कन्या धनश्री तळवलकर यांनी येथे केले. स्वाध्याय परिवारातर्फे येथे अंबाबाई तीर्थयात्रेच्या पूर्णाहुती सोहळा समारोपप्रसंगी स्वाध्यायींना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
या सोहळय़ास राज्य, बेळगाव, गोव्यातून आलेला विराट जनसमुदाय उपस्थित होता. या समारोपप्रसंगी महापौर अश्विनी रामाणे यांनी तळवलकर यांचे स्वागत केले. या वेळी खासदार धनंजय महाडिक, बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, आमदार उल्हास पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे उपस्थित होते.
देवाचा विचार, माणसांशी संबंध आणि देवाचे माणसाच्या जीवनातील महत्त्व या विषयी तळवलकर यांनी मार्गदर्शन केले. तळवलकर म्हणाल्या, देव एकच असतो. आदिशक्ती म्हणून लक्ष्मीची विविध रूपे, नावे आणि प्रत्येकाने केलेली स्तुती वेगळी असू शकते. प्रत्येकाच्या अडचणीच्या काळात मदतीचा आधार म्हणजे देवाचा दरवाजा असतो. त्यातूनच हाडामांसाची, रक्ताची माणसे जोडली जातात. रुमानियातील फोकलरी मुव्हमेंटच्या प्रमुख मारिया गोस ऊर्फ ऐमाँस यांनी इटालियन भाषेतून केलेल्या भाषणात दादा पांडुरंगशास्त्री आठवले यांच्याबद्दलचे ऋणानुबंध सांगितले.