19 September 2020

News Flash

 मंगलमय वातावरणात विघ्नहर्त्यांचे आगमन

करोनामुळे मिरवणुकांना बगल, घरगुती प्रतिष्ठापना उत्साहात

कोल्हापूर शहरात गणरायाचे मोठय़ा उत्साहातआगमन झाले.

करोनामुळे मिरवणुकांना बगल, घरगुती प्रतिष्ठापना उत्साहात

कोल्हापूर : ‘गणपती बाप्पा मोरया..‘ अशी साद घालत आणि ‘बाप्पा, आता करोना संपू दे‘, अशी मनोभावे प्रार्थना करीत शनिवारी कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात विघ्नहर्त्यां गणरायाचे आगमन मोठय़ा उत्साहात झाले. गेल्या पाच महिन्यांपासून करोनाच्या पार्श्वभूमीवर दाटलेल्या उदासीच्या वातावरणात गणपती बाप्पांच्या आगमनामुळे काही काळ चैतन्य भरून राहिले. दरम्यान करोनाची काळजी घेत पण तेवढय़ाच उत्साहात घरगुती गणेशाची प्रतिष्ठापना झाली.

यंदा घरगुती गणपतीचा मुक्काम सहा दिवसांचा तर सार्वजनिक मंडळांच्या बाप्पांचा मुक्काम दहा दिवसांचा राहणार आहे. या काळात करोनाच्या पाश्र्वभूमीवर आवश्यक ती सर्व खबरदारी घेत धार्मिक विधी करण्यावर भर राहणार आहे.आज सकाळी कुंभारवाडय़ात श्री मूर्ती आणण्यासाठी लोकांनी सुरक्षिततेचे नियम पाळत गर्दी केली होती. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख सकाळपासून नजर ठेवून होते. गणरायाचे आगमन होताना मोरयाचा गजर आणि फटाक्यांची आतषबाजीने काही काळ करोनाचा तणाव दूर होत चैतन्य पसरले. घराघरात, सार्वजनिक मंडळांमध्ये यथासांग पूजा करुन श्री गणेशाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. गणपतीच्या आवडीच्या उकडीच्या मोदकाचा नैवेद्यही दाखवण्यात आला.

महालक्ष्मी मंदिरात विधी

श्री महालक्ष्मी भक्त मंडळातर्फे यंदा करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिरातील गरुड मंडपात एकशे तिसाव्या वर्षी गणेशोत्सव साजरा होत आहे. पापाची तिकटी येथून काल गणेशमूर्ती मंदिरात आणण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष राजू मेवेकरी व सहकाऱ्यांनी आज विधिवत पूजा करून गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली.

महागणपती यंदा २१ फूट नव्हे २१ इंची

शिवाजी चौक तरुण मंडळाने यंदा शिवाजी चौकात महागणपतीची प्रतिकृती असलेल्या २१ इंची मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. येथे पंधरा बाय वीस आकाराचा एलईडी स्क्रीन उभारला आहे. तेथेही अनेक भक्तांनी महागणपतीच्या दर्शनाचा लाभ घेतला. राजर्षी शाहू मार्केट यार्डमध्ये दरवर्षी प्रमाणे विराजमान होणाऱ्या २१ फुटी महागणपतीचे मुखदर्शन आता सुरु झाले आहे.

मंडळांमध्ये लगबग

करोनाच्या पाश्र्वभूमीवर उत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय सार्वजनिक मंडळांनी घेतला आहे. त्यामुळे मंडळांमध्ये आता लगबग सुरु झाली असून अनेक मडळांनी काल रात्रीच गणेश मूर्ती आणल्या. आज विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. यंदा आगमन व विसर्जन मिरवणुकीला मनाई असल्याने मंडपात मोजक्याच कार्यकर्त्यांंच्या उपस्थितीत धार्मिक विधी करण्यात आला. यंदा या मूर्तींची उंची दरवर्षी पेक्षा कमी आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 23, 2020 12:01 am

Web Title: arrival of lord ganeshi in kolhapur city with great enthusiasm zws 70
Next Stories
1 कोल्हापूर उद्यमनगरी प्राणवायूअभावी संकटात
2 इचलकरंजीतील यंत्रमागधारकांना दिलासा
3 कोल्हापुरात गतवर्षीच्या महापुरातील मदतीचा घोटाळा
Just Now!
X