18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

देवदासी, बेरड समाजाचा उद्धारक

बेरड तसेच देवदासी समाजाच्या उन्नतीसाठी स्वत:ला वाहून घेतले .

दयानंद लिपारे, कोल्हापूर | Updated: August 9, 2017 3:02 AM

‘उत्थान’ या संस्थेत वाढलेली,  शास्त्र शाखेची पदवीधर झालेली मुथम्मा ही देवदासी कन्या. कमी वयात असतानाच मातृछत्र हरपलेले. तरीही तिने जिद्दीच्या जोरावर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविले. वरिष्ठ अधिकारी बनलेली मुथम्मा प्रांत अधिकारी झाली आणि त्या दिवशी  ‘उत्थान’  केंद्रातील सर्व मुलींनी दीपोत्सव साजरा केला. हीच मुथम्मा आता केंद्रातील सहा मुलींच्या संगोपनाची जबाबदारी पेलते आहे. .. या आणि अशा अनेक मुथम्माच्या जीवनाला आकार आणला तो डॉ. भीमराव गस्ती यांनी. समाजाच्या भोगवादाला बळी पडलेल्या देवदासी असोत,जन्मजात चोरीचा शिक्का बसलेला बेरड समाज असो, की समाजातील वंचितांचे गुंतागुंतीचे प्रश्न; या सर्वासाठी गस्ती यांचे कार्य प्रेरक ठरले.

गस्ती यांचा जन्म बेळगावचा. बेरड जातीतला. बेरड, रामोशी आदी जातींवर तत्कालीन समाजाने चोर म्हणून शिक्का मारलेला. अशा प्रतिकूल परिस्थितीत भीमरावांना तारले ते शिक्षणाने. शाळेत एखादी चोरी झाली, तरी शिक्षक व विद्यार्थी त्यांनाच  मारत. त्याही परिस्थितीत त्यांनी शाळेत पहिला क्रमांक घेणे कधीही सोडले नाही. पुढे आंध्र, वारंगळ या ठिकाणी पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला. विद्यापीठात शिक्षण घेत असताना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील साहित्य वाचले. विद्यापीठामध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधून प्रथम आल्यामुळे त्यांना रशियामध्ये पीएच.डी.साठी जाण्याची संधी मिळाली. वैद्यकीय-औद्योगिक संशोधन संस्थेत भूभौतिक संशोधन केंद्रात संशोधक म्हणून  त्यांना नोकरीही मिळाली, पण आणीबाणीत अटक झाल्याने नोकरी गेली.नोकरीला कायमचा रामराम ठोकायचा निश्चय करूनच गस्ती तुरुंगाबाहेर पडले . तेव्हापासून त्यांनी बेरड तसेच देवदासी समाजाच्या उन्नतीसाठी स्वत:ला वाहून घेतले . वयाच्या २५ व्या वर्षी पर्यावरणाला धक्का पोहोचवणाऱ्या िहडालचा लढा देऊन परकीय लोकांचा कारखाना बंद पाडला.

प्रबोधनाची वाटचाल

भीमरावांवर  प्रारंभी समाजवादी विचारांचा  प्रभाव होता. नंतर त्यांचा कल  सामाजिक समरसतेकडे झुकला .  रशियात फिरताना आलेले अनुभव त्यांनी  ‘बेरड ’आत्मचरित्रात शब्दबद्ध केले आहेत. सामाजिक क्षेत्रात कार्य करावं की नोकरी करून आपला धर्म सांभाळावा अशी द्विधा मन:स्थिती असणाऱ्यांसाठी हे आत्मकथन पायवाट दाखवणारे आहे . समाजहितासाठी नव्याने संघटना बांधू पाहणाऱ्या,चळवळ उभी करू पाहणाऱ्या तरुणाईला  एक दिशादर्शकही ठरते . याशिवाय ‘आक्रोश’, ‘कौरव’, ‘रानवारा’ ही त्यांची पुस्तके गाजली आहेत. त्यांच्या या कामाची दखल घेऊन न्यू इंडियन एक्स्प्रेस वृत्तसमूहाने त्यांना ‘पर्सन ऑफ द इयर २००७’  हा सन्मान देऊन गौरवलेले आहे. असा हा बेरड समाजाचा तारणहार आणि देवदासींचा ‘देव ’ आता कायमचा अंतरला  आहे .

देवदासींसाठी समर्पित आयुष्य

‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’, हा डॉ. आंबेडकरांचा मंत्र गस्तींनी शब्दश: आचरणात आणला. तेव्हा उत्तर कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्रात देवदासींच्या  शोषणाचा प्रश्न ज्वलंत बनला होता . भीमरावांच्या घरीच   देवदासी बनलेली बहीण आणि मेहुणी. त्यांच्या नशिबाचा फेरा गस्तींना अस्वस्थ करीत होता. देवदासी प्रथा बंद व्हावी म्हणून आंदोलनाच्या, सत्याग्रहाच्या मार्गाने न जाता गस्तींनी त्या देवदासींना सक्षम बनवण्याचा उपक्रम हाती घेतला. गस्तींनी त्यांच्या मुलींना शिक्षण दिले. बेळगाव ,  विजापूर, बागलकोट, रायचूर, बेल्लारी, गुलबर्गा जिल्ह्यतील दोनेकशे मुली शिकल्या. शिकू न शकलेल्या मुलींना  शिवणकामासह स्वावलंबी बनवणारे प्रशिक्षण दिले .  देवदासींना वाचवा, अशी हाकाटी करीत आलेल्या तरुणांनाच गस्तींनी त्यांच्याशी विवाह करायला तयार केले . त्यांच्या प्रदीर्घ प्रयत्नामुळे देवदासींच्या मुली आता शिक्षण घेऊन शिक्षिका, प्राध्यापिका, तहसीलदार इ. झालेल्या आहेत. तीस हजार देवदासींना गस्तींच्याच प्रयत्नातून निवृत्ती वेतन देणे शासनाला भाग पडले .  ‘उत्थान’ या संस्थेच्या माध्यमातून कार्य करताना  शासनाकडून मदत घेण्याचे टाळले.  परदेशी मदत घेण्याचाही विचार केला नाही. देवदासी ही समाजातीलच एक आहे, समाजानेच तिचे पुनर्वसन करायला हवे, या विचाराने भीमरावांनी लोकांमध्ये जनजागृती करण्याचे प्रयत्न सुरू केले.

दीर्घकाळ गुन्हेगारीचा शिक्का कपाळावर बसलेल्या बेरड समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी भीमराव गस्ती यांनी चळवळ उभारली. स्वातंत्र्यपूर्व व नंतरच्या काळात बेरड, रामोशी समाजावरील अत्याचाराबाबत डॉ.गस्ती  यांच्या मनात चीड होती.  शाळेत एखादी चोरी झाली, तरी शिक्षक व विद्यार्थी मलाच मारत, असे ते सांगत.

दरोड्याच्या गुन्ह्यत बेरड समाजातल्या वीस निरपराधांना कर्नाटक पोलिसांनी अटक करुन त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले. या अन्यायाने पेटून उठलेल्या गस्तींनी न्यायासाठी आंदोलनाचा मार्ग पत्करला . त्यांनी बेरड समाजाच्या उन्नतीसाठी स्वत:ला वाहून घेतले.

First Published on August 9, 2017 3:02 am

Web Title: article on social activist dr bhimrao gasti