विदर्भ—मराठवाडय़ात कृत्रिम पाऊस पाडण्याची निविदा प्रक्रीया पूर्ण झाली आहे. येत्या महिन्याभरात अंदाज घेऊ न हा कृत्रिम पावसाचा प्रयोग करणार आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी दिली.

यंदा पावसाने उशिरा दर्शन दिले. त्यानंतर गेले पंधरा दिवस जोरदार पाऊस पडला आहे. मात्र, विदर्भ—मराठवाडय़ात अपेक्षेपेक्षा कमी पाऊ स पडला आहे. शेतीची कामे खोळंबली आहेत. याचा अंदाज आल्याने मे महिन्याच्या अखेरीस महसूल मंत्री पाटील यांनी दुष्काळावर उपाय म्हणून राज्य सरकार लवकरच कृत्रिम पावसाचे प्रयोग करणार असल्याची घोषणा केली होती. कृत्रिम पावसाचे हे प्रयोग जास्तीत जास्त मराठवाडय़ात करण्यात येतील,असेही ते म्हणाले होते. आता पावसाने उघडीप दिली असून विदर्भ—मराठवाडय़ात पावसाची चिंता व्यक्त केली जात आहे.

याबाबत आज मंत्री पाटील यांना विचारणा केली असता ते म्हणाले, कृत्रिम पाऊस पाडण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाला. त्याची  निविदा मागवण्यात आली असून तीही  प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे  महिन्याभरात अंदाज घेऊ न हा कृत्रिम पावसाचा प्रयोग करणार आहे. कृत्रिम पावसाबाबत मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील, असे त्यांनी नमूद केले.

प्रदेशाध्यक्षपद अनुत्तरित

रावसाहेब दानवे यांना केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांचे प्रदेशाध्यक्षपद रिक्त आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.या पदासाठी नेत्याचा शोध सुरू असून मंत्री पाटील यांचेही नाव आघाडीवर आहे. यावर पाटील यांनी कोटी करत ‘राज्यात नवीन काही घडत असेल तर माझ्या नावाची चर्चा होतच असते,’ असे सांगत स्पष्ट वक्तव्य करणे टाळले.