14 October 2019

News Flash

दोन कोटींचा गंडा घालणाऱ्यांची ७५ लाखांची मालमत्ता जप्त

आर्थिक गुन्हे शाखेने तपास करून या प्रकरणी नेर्लेकर याच्यासह सहाजणांना अटक केली होती.

प्रतिनिधिक छायाचित्र

आभासी चलनाच्या माध्यमातून फसवणूक

कोल्हापूर : झीप कॉइन्स या आभासी चलनाच्या माध्यमातून १८ गुंतवणूकदारांना दोन कोटीचा गंडा घालणाऱ्या राजेंद्र भीमराव नेर्लेकर (रा. हुपरी, ता. हातकणंगले) याची ७५ लाखाची मालमत्ता आर्थिक गुन्हे शाखेने जप्त केली आहे. यामध्ये ४० लाखाच्या आलिशान मोटारीचा समावेश आहे, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक आर. बी. शेडे यांनी मंगळवारी दिली.

नेर्लेकर याने पुण्यातील बालाजी गणेश याच्या मदतीने शहरातील लक्ष्मीपुरी भागात ‘बिग ड्रीम्स ग्रुप’ या नावाने व्यवसाय सुरू केला. २०१७ मध्ये त्याने क्रिप्टो करन्सीद्वारे गुंतवणूकदारांना व्याजरूपाने भरीव परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवणारा व्यवसाय सुरू केला. गुंतवणूक केल्यास दर महिन्याला १५ टक्के परतावा देणार असल्याचे त्याने सांगितले होते. या आमिषाला बळी पडून १८ गुंतवणूकदारांनी दोन कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. मात्र मुदत पूर्ण होऊनदेखील परतावा न मिळाल्याने बाळासाहेब लक्ष्मण झालटे (रा. शिवाजी पार्क) या गुंतवणूकदाराने  पोलिसात गुन्हा दाखल केला होता.

आर्थिक गुन्हे शाखेने तपास करून या प्रकरणी नेर्लेकर याच्यासह सहाजणांना अटक केली होती. संशयित नेर्लेकर याची ४० लाखाची आलिशान मोटार तसेच २५ लाखाची रोकड, ११ लाखाचे सोने अशी एकूण पाऊण लाखाची मालमत्ता जप्त केली आहे.

पुणे येथील बालाजी गणेश याचे घर सील करण्यात आले असून त्याचाही लवकरच जाहीर लिलाव करण्यात येणार आहे. त्यातून येणारी रक्कम ही जप्त केली जाणार आहे.

First Published on May 15, 2019 4:31 am

Web Title: assets of 75 lakhs seized by the economic offenses