इचलकरंजीतील घटना, डॉक्टरांना मारहाण

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याच्या आरोप करत संतप्त नातेवाइकांनी इचलकरंजी येथील एका रुग्णालयाची मोडतोड करत एका डॉक्टरांना बेदम मारहाण केली. या प्रकारामुळे हॉस्पिटलमध्ये तणाव निर्माण झाला होता. अर्जुन निवृत्ती जाधव (वय ४७, रा. भारतमाता हौसिंग सोसायटी) असे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णाचे नांव आहे. या वेळी घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

येथील संजीवनी हॉस्पिटलमध्ये जाधव हे उपचारासाठी दाखल झाले होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. मात्र औषधोपचाराला प्रकृती साथ देत नसल्याने संबंधित डॉक्टरांनी जाधव यांच्या नातेवाइकांशी चर्चा करुन त्यांना अन्यत्र हलविण्याबाबत सूचना दिल्या होत्या. दरम्यान मंगळवारी सकाळी जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याची माहिती नातेवाइकांना देण्यात आली.  यावर डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच जाधव यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाइकांनी रुग्णालयात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या काचा फोडण्यात आल्या. तसेच सीसीटिव्ही कॅमेरा, दूरध्वनी जोडणीचे नुकसान करण्यात आले. या वेळी डॉ. सुनील बडवे यांना बेदम मारहाण करण्यात आली.  या वेळी दाखल झालेल्या पोलिसांनी नातेवाइकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र नातेवाईक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. जोपर्यंत डॉक्टरांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा त्यांनी घेतला. अखेरीस जाधव यांचे कोल्हापुरातील ‘सीपीआर हॉस्पिटल’मध्ये शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर परिस्थिती नियंत्रणाखाली येऊन वातावरण निवळले. मारहाण झालेल्या डॉ. बडवे यांच्यावर उपचार सुरु आहेत.

या संदर्भात डॉ. इम्तियाज पठाण व डॉ. पद्मज बडबडे  म्हणाले,की जाधव यांना निमोनिया झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक बनल्याने व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. जाधव यांची प्रकृती उपचाराला साथ देत नसल्याने त्यांना अन्य रुग्णालयामध्ये हलविण्या संदर्भात सूचनाही केल्या होत्या. आज सकाळी त्यांना कोल्हापुरातील एका रुग्णालयामध्ये हलवण्यात येणार होते. मात्र दुर्दैवाने उपचार सुरु असतानाच जाधव यांचा मृत्यू झाला.