मराठी भाषकांची सातत्याने कोंडी करणाऱ्या कर्नाटक सरकारने आता सीमा सीमाभागातील मराठी सांस्कृतिक परंपरेवर वरवंटा फिरवण्याचे धोरण हाती घेतले  आहे. सीमाभागातील कुद्रेमनी आणि इदलहोंड येथे आयोजित केलेले मराठी साहित्य संमेलन होऊ  न देण्याचा पवित्रा कर्नाटक पोलिसांनी घेतला.

साहित्य संमेलन भरवणार नाही अशा आशयाचे पत्र त्यांनी संयोजकांकडून घेतले.  मात्र मराठी भाषकांनी आपल्या एकीच्या जोरावर साहित्य संमेलनाला परवानगी मिळवली. त्यामुळे उद्या रविवारी हे साहित्य संमेलन पार पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सीमा भागामध्ये अनेक गावांमध्ये मराठी साहित्य संमेलने होत असतात. उद्या रविवारी इदलहोंड येथे सतरावे गुंफण साहित्य संमेलन, श्रीपाल सबनीस यांच्या तर कुद्रेमनी येथील संमेलन मुंबईचे ज्येष्ठ साहित्यिक अशोक बागवे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. पण मराठी साहित्याचा जागर होत असल्याचा प्रकार कर्नाटक शासनाच्या डोळ्यात खुपला.

संमेलनाला परवानगी घेतली नसल्याची संधी साधत पोलिसांनी दबाव टाकून संयोजकांकडून ‘संमेलन भरवले जाणार नाही’ असे पत्र  घेतले. मात्र यानंतर या परिसरातील मराठी भाषक एकत्रित आले. त्यांनी त्यांच्या एकीच्या जोरावर आपला आवाज बुलंद केला. अखेर शासनाला या साहित्य संमेलनाला परवानगी देणे भाग पडले.