05 April 2020

News Flash

पक्षांतरामुळे नुकसान काँग्रेसचे की आवाडेंचे?

काँग्रेसच्या धर्मनिरपेक्ष विचाराला लोक जवळ करीत नाहीत. तरुणाई तर यामुळे काँग्रेस पासून अंतरली आहे,

(संग्रहित छायाचित्र)

दयानंद लिपारे, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्य़ात काँग्रेस आणि आवाडे असे नाते गेली पाच दशके अतूट होते. माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, त्यांचे सुपुत्र कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश आवाडे यांच्या राजकारणात अनेक वेगळ्या वाटा-वळणे आली तरी त्यांची छाप ही मुख्यत्वेकरून काँग्रेस हीच राहिली. आता निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असताना विधानसभेचे वेध लागलेल्या आवाडे कुटुंबातील तिन्ही पिढय़ांनी एकाचवेळी काँग्रेसला रामराम ठोकला असून ‘राम’नामाच्या राजकारणाकडे त्यांची पावले वळू लागली आहेत.

काँग्रेसचे धर्मनिरपेक्ष विचारांचे राजकारण चालणार नाही त्याऐवजी तेजीत असणारे आणि यशाकडे नेणारे हिंदुत्ववादी राजकारण त्यांना भुरळ घालत आहे. युतीत अंतर पडून शिवसेना स्वतंत्र लढणार असेल तर निवडणुकीपूर्वी आवाडे हाती शिवबंधन बांधून घेतील, हे निश्चित.

कोल्हापूर जिल्ह्य़ात गेल्या आठवडय़ात दोन महत्वाच्या घटना घडल्या. गेल्या शनिवारी कोल्हापूर जिल्हा काँग्रेस समितीच्या भवनात बांधलेल्या भव्य सभागृहाचे उद्घाटन लोकसभेतील काँग्रेसचे माजी गटनेते, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकाजुर्न खरगे यांच्या हस्ते व प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली झाले. माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी खासदार जयवंतराव आवळे, आमदार सतेज पाटील, माजी आमदार पी. एन.पाटील अशा जिल्ह्य़ातील प्रमुख नेत्यांनी प्रदीर्घ काळानंतर एका मंचावर येत काँग्रेसच्या ऐक्याचे दर्शन घडवले. या वेळी प्रकाश आवाडे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची उमेदवारी यादी लवकर जाहीर करावी त्यानुसार प्रचाराला लागता येईल, अशी आग्रही मागणी केली होती. त्यानंतर चार दिवसांनंतर त्यांनी  काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने  खळबळ उडाली.

राजकारणाच्या वाटा- वळणे

कोल्हापूर जिल्हय़ात आवाडे घराण्याचा पाच दशके प्रभाव राहिला. विशेषत: इचलकरंजी परिसरातील सहकारात माजी खासदार, माजी उद्य्ोग राज्यमंत्री कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी नाव कमावले. सहकारी सूतगिरण्या, साखर कारखाना, बँका, कापड प्रक्रिया गृह, पहिली महिला सूतगिरणी याद्वारे त्यांनी सहकाराला यशाचा मार्ग दाखवला. तर त्यांचा राजकीय वारसा चालवताना प्रकाश आवाडे यांनी चार वेळा आमदार, दोन वेळा मंत्रिपद भूषवले. त्यांच्या पत्नी किशोरी आवाडे या इचलकरंजीच्या सर्वाधिक सात वर्षे नगराध्यक्ष होत्या. चिरंजीव राहुल आवाडे  जिल्हा परिषद सदस्य असून सध्या हे एकमेव लोकप्रतिनिधी असणारे पद त्यांच्या घरात उरले आहे. कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी प्रारंभी यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे काम केले. शरद पवार यांनी पुलोदची चूल मांडल्यावर त्यांनी पवारांना साथ दिली. पवारांसमवेत ते पुन्हा स्वगृही परतले. पवारांनी पुढे राष्ट्रवादीची स्थापना केली पण त्यांच्या सोबत जाण्याचे त्यांनी टाळले. तथापि पवारांशी त्यांचे संबंध चांगले राहिले. किंबहुना त्यांच्या सल्ल्यानेच ते २०१४ साली राजू शेट्टी यांच्या विरोधात लढण्यास तयार झाले, पण त्यात यश मिळाले नाही. तत्पूर्वी २००९ सालच्या निवडणुकीत प्रकाश आवाडे निवडणूक हरले होते. गतवेळीही भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी त्यांना पराभूत केले होते. सलगच्या या पराभवामुळे आवाडे गटाची पीछेहाट होत राहिली.  इचलकरंजी नागरपालिकाही काँग्रेसकडून भाजपकडे गेली. काँग्रेसचे वरिष्ठ आणि जिल्ह्य़ातील प्रमुखांची साथ मिळत नाही असा त्यांचा अनुभव होता. त्यातून त्यांनी गेली जिल्हा परिषद कोल्हापूर जिल्हा ताराराणी आघाडीच्या माध्यमातून लढवून पुत्र राहुल यांना निवडून आणले होते.

तिरंग्याकडून भगव्याकडे

काँग्रेसच्या धर्मनिरपेक्ष विचाराला लोक जवळ करीत नाहीत. तरुणाई तर यामुळे काँग्रेस पासून अंतरली आहे, असा तर्क अलीकडे आवाडे यांनी मांडला आहे. महायुतीच्या आक्रमक राष्ट्रीय विचारधारा राजकारणात प्रभाव पाडत आहे हे जाणून प्रकाश आवाडे यांनी सौम्य हिंदुत्ववाद जवळ केला. दोन वर्षांपूर्वी संभाजी भिडे गुरुजी यांना रायगडाच्या सुवर्ण सिंहासन कार्यासाठी मदत करण्याची भूमिका त्यांनी घेतली. इचलकरंजी नगरपालिकेकडे छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभा करण्याची मागणी केली. यंदा जूनमध्ये रायगडावर संभाजीराजे छत्रपती यांच्या समवेत शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला. यंत्रमागधारकांच्या आंदोलनाचा संदर्भ घेऊन प्रत्येक कार्यक्रमात ते विश्व हिंदू परिषदेचे स्थानिक नेते बाळ महाराज यांचे कौतुक करीत राहिले. तर काश्मीरचे ३७० कलाम रद्द करण्याचा निर्णय घेतल्यावर त्यांनी इचलकरंजी काँग्रेस कमिटीच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाचे जाहीर स्वागत केले. त्यांच्या जवाहर साखर कारखान्याच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाला महसूल, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना खास निमंत्रित केले. त्यांचा हा सारा मार्ग काँग्रेसच्या पारंपरिक एकारलेल्या राजकारणाला सोडून हिंदुत्वाला गवसणी घालण्याचा होता. काँग्रेसशी जोडलेले पाच दशकाचे नाते त्यांनी आता सोडले आहे. भाजप- शिवसेना युतीचे गणित जुळले नाही तर प्रकाश आवाडे शिवबंधन बांधलेले दिसतील. गुरुवारी शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी आवाडे कुटुंबीयांची भेट घेऊन केलेली चर्चा बरेच काही सूचित करणारी आहे. सहकार-राजकारणातील आवाडे यांच्यासारखे बडे प्रस्थ हाती लागले तर शिवसेनेच्याही ते पथ्यावर पडणारे आहे.

‘काँग्रेस भक्कम राहणार’

आधीच मरगळलेल्या काँग्रेसला आवाडेंच्या पक्षत्यागाने मोठा धक्का बसला. मात्र काँग्रेस नेत्यांना हे अजिबात मान्य नाही. ‘आवाडे बाजूला गेले तरी काँग्रेसला निवडणुकीत यश मिळेल, काँग्रेस आपले स्थान बळकट करेल’ असा विश्वास आमदार सतेज पाटील, माजी आमदार पी. एन. पाटील यांनी व्यक्त केला आहे. या दोन्ही नेत्यांचे कार्यक्षेत्र, प्रभावक्षेत्र वेगळे असल्याने त्यांना आवाडेंच्या जाण्याने फरक पडणार नाही हे खरे आहे. मात्र हातकणंगले मधील जयवंतराव आवळे आणि शिरोळमधील आघाडीच्या उमेदवाराला हा धक्का असणार आहे. आवाडे सेनेत गेले तर खासदार धैर्यशील माने, त्यांच्या मातोश्री माजी खासदार निवेदिता माने यांच्याशी सूर जुळणार का किंवा काँग्रेसमधील बेदिलीचे रंगरूप बदलून नवे राजकारण सुरू होणार हा प्रश्न आहेच.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2019 4:13 am

Web Title: awade family quit congress join bjp ahead of assembly poll zws 70
Next Stories
1 आजरा साखर कारखान्याचे भवितव्य अधांतरी
2 पानसरे हत्याप्रकरणी अटक केलेल्या तिघांना १६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी
3 आंबा घाटात दरड कोसळल्याने रत्नागिरी-कोल्हापूर वाहतूक विस्कळीत
Just Now!
X