कोल्हापुरात शांतता समितीचे एकमुखी आवाहन

अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काहीही लागला, तरी त्याचे स्वागत करून जिल्ह्यमध्ये बंधुभाव राखून शांतता प्रस्थापित करून कोल्हापूरचा आदर्श देशात निर्माण करू, असा सामाजिकतेचा संदेश बुधवारी येथे  झालेल्या जिल्हास्तरीय शांतता समितीच्या बैठकीत उपस्थित सर्वानीच दिला.

रामजन्मभूमी बाबरी मशीद जागेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाकडून होणाऱ्या निकालाच्या पाश्र्वभूमीवर आणि ईद—ए—मिलाद सणाच्या निमित्ताने सामाजिक शांतता व सुव्यवस्थेबाबत शाहू स्मारक येथे शांतता समितीची आज झाली.

बैठकीचे अध्यक्ष श्रीमंत छत्रपती शाहू महाराज म्हणाले, की कोल्हापूर हा पुरोगामी विचारांचा जिल्हा राहिला आहे. डॉ. आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेचं संवर्धन आपल्याला निकालाचे स्वागत करून करायचे आहे. खासदार धैर्यशील माने म्हणाले, की गालबोट लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या विघ्नसंतोषी प्रवृत्ती वेळीच रोखली पाहिजे. जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, की समाजामध्ये गडबड करणाऱ्यांवर वचक ठेवण्याची ताकद तुमच्यामध्येही आहे. ती वापरली तर समाजात कुठलीही तेढ निर्माण होणार नाही. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख म्हणाले, की न्यायालयाचा निकाल सर्वानी स्वीकारताना त्याच्यावर कोणतीही टीकाटिपणी होणार नाही याची दक्षता घ्यावी. शाहूंच्या न्यायाच्या संदेशाचा विचारांचा वारसा आपण ठेवू.

आर. के. पोवार, निवास साळोखे, मौलानी इरफान, इचलकरंजीचे सलीम अत्तार, शिवजी व्यास यांनीही सलोखा ठेवण्याची सर्वाची जबाबदारी असल्याचे मत व्यक्त केले. अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी आभार मानले. महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, अपर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, प्रांताधिकारी वैभव नावडकर उपस्थित होते.

समाज माध्यमांवर र्निबध ?

आमदार चंद्रकांत जाधव म्हणाले, की जातिधर्माचा विचार सोडून पुढील पिढीच्या प्रगतीचा सर्वानी विचार करावा. समाज माध्यम बंद करावे, जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार होणार नाही. पश्चिम देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव म्हणाले, की ‘समाज माध्यम’ हे सध्या वादाचं कारण बनत आहे. सर्वोच्च न्यायालय जो निकाल देईल त्याचे राजर्षी शाहूंच्या पुतळ्यासमोर एकत्र येऊन स्वागत करू, असे मत मुस्लीम बोर्डिगचे अध्यक्ष गणी आजरेकर यांनी या वेळी मांडले.