चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

नागरिकता संशोधन कायद्याबाबत भाजपा कार्यकर्त्यांनी प्रबोधन करावे, असे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी येथे केले.

भाजपा प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी भाजपा जिल्हा कार्यालय येथे भाजपा पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते यांच्याशी नागरिकता संशोधन कायद्याबाबत संवाद साधला. यावेळी पाटील म्हणाले, विरोधक या कायद्याबाबत समाजामध्ये गैरसमज पसरवत आहेत. नागरिकता संशोधन कायदा हा कोणत्याही धर्माविरुद्ध नसून हा कायदा नागरिकत्व देण्यासाठी आहे. कोणाचे नागरिकत्व काढून घेण्यासाठी नाही. या कायद्याचे महत्त्व, व्यापकता, हा कायदा नेमका कोणत्या नागरिकांच्यासाठी आहे याचे स्पष्टीकरण सोप्या भाषेत लोकांच्या समोर मांडले पाहिजे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी माहितिपत्रकाच्या माध्यमातून समाज प्रबोधनासाठी घरोघरी संपर्क साधून, लोकांच्या मनातील शंका, गैरसमज दूर करून जनजागृती करावी.

याप्रसंगी अक्षय निरोखेकर आणि विद्या म्हमाणे-पाटील यांनी या कायद्याबाबत मुंबई प्रदेश कार्यालयातील प्रशिक्षण वर्गामध्ये घेतलेली माहिती स्थानिक पदाधिकारी यांना सांगितली.  प्रास्ताविक प. म. देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव यांनी केले.

सरचिटणीस विजय जाधव यांनी आभार मानले. जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, सरचिटणीस विजय जाधव, दिलीप मेत्राणी, गटनेते विजय सूर्यवंशी, आर.डी.पाटील, अ‍ॅड. संपतराव पवार, नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील, अजित ठाणेकर, आशिष ढवळे आदी उपस्थित होते.