महापालिका क्षेत्राची हद्दवाढ होण्यासाठी भाजप महानगरच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत मंगळवारी जिल्हाधिकारी अमित सनी यांना निवेदन सादर केले. शहराची हद्दवाढ झाल्यास केंद्र व राज्य सरकार कडून शहराच्या पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी मिळेल, असा विश्वास व्यक्त करताना हद्दवाढीमध्ये गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत व शिरोली औद्योगिक वसाहतींचा समावेश व्हावा, अशी आग्रही मागणी निवेदनात  केली.

आज सकाळपासून भाजपा पदाधिकारी व कार्यकत्रे मोठ्या संख्येने आंदोलन स्थळी उपस्थित होते. त्यानंतर दुपारी कोल्हापूर शहराची हद्दवाढ झालीच पाहीजे या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांना भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निवेदन दिले.

माजी जिल्हाध्यक्ष महेश जाधव म्हणाले, की आज कोल्हापूर शहराची हद्दवाढ व्हावी यासाठी भाजपा सरकार प्रयत्नशील आहे. गेली ४० वष्रे या शहराची एक इंचही वाढ झालेली नाही. ग्रामीण भागातील नागरिकांची दिशाभूल करुन हा प्रश्न कायमच मतांच्या राजकारणासाठी टांगता ठेवला असल्याचा आरोप केला.

माजी नगरसेवक आर.डी.पाटील यांनी, हद्दवाढ झाली नाही तर महानगरपालीकेचे अस्तित्व धोक्यात येईल असे नमूद केले.जिल्हा सरचिटणीस विजय जाधव यांनी हद्दवाढीनंतर कोल्हापूर शहराला मिळणाऱ्या विविध निधीची व योजनांची माहिती दिली. सरचिटणीस अशोक देसाई यांनी कोल्हापूर शहराची हद्दवाढ न झाल्यामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांची माहिती दिली.

नगरसेवक संभाजी जाधव, अजित ठाणेकर, किरण नकाते, सुनील कदम, सत्यजीत कदम, उमा इंगळे, ताराराणी आघाडीचे सरचिटणीस सुहास  लटोरे,  हेमंत आराध्ये, अमोल पालोजी, भारती जोशी,  प्रभा टिपुगडे, रेखा वालावलकर आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकत्रे उपस्थित होते.