04 December 2020

News Flash

भाजपला महाविकास आघाडीचे आव्हान

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात चुरस

(संग्रहित छायाचित्र)

दयानंद लिपारे

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणूक जाहीर झाल्यानंतर इच्छुकांच्या हालचाली वाढल्या आहेत. या दोन्ही मतदारसंघांतील निवडणूक भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा होणार आहे. पदवीधर मतदारसंघातून दोन वेळा निवडून आलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना आघाडीचे आव्हान पेलावे लागणार आहे.

पुणे पदवीधर व पुणे शिक्षक मतदारसंघाची निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. या दोन्ही मतदारसंघांमध्ये या वेळी इच्छुकांची संख्या मोठय़ा प्रमाणात असल्याने सक्षम उमेदवारीचा गुंता सोडवणे हे भाजप आणि आघाडीसमोर आव्हान असणार आहे. इच्छुकांची संख्या पाहता बंडखोरी चिन्हेही दिसत आहेत. बंडखोरीमुळे विजयाचे समीकरणही बदलू शकते हे गेल्या दोन्ही वेळी दिसून आले आहे. पदवीधर मतदारसंघांमध्ये भाजपचे वर्चस्व राहिले आहे. भाजपचे प्रकाश जावडेकर हे या मतदारसंघाततून विजयी होत असत. जनता दलाचे शरद पाटील यांनी भाजपच्या वर्चस्वाला धक्का दिला होता. तर चंद्रकांत पाटील यांनी हा मतदारसंघ गेल्या दोन्ही निवडणुकीत भाजपकडे  राखण्यात यश मिळवले आहे.

 बंडखोरीने बदलते समीकरण

शरद पाटील, माणिक पाटील व राजेश वाठारकर यांच्या मतविभागणी झाल्याने चंद्रकांत पाटील विधान परिषदेत पोहचले. गेल्यावेळी पाटील यांचा विजय राष्ट्रवादीतील बंडखोरीमुळे झाला असल्याचे निकालाचे आकडे सांगतात. १ लाख ६ हजार मतापैकी चंद्रकांत पाटील यांना ५१ हजार ८११ मते मिळाली होती. साताऱ्याचे सारंग पाटील यांनी ४४ हजार ७७७ मते घेत चांगली लढत दिली होती. सांगलीचे अरुण लाड (३७ हजार १८९) यांची बंडखोरी नसती तर सारंग पाटील यांचा विजय शक्य होता. आता पाटील यांनी विधानसभेत स्थान मिळवले आहे. उमेदवारीसाठी भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांचे नाव आघाडीवर आहे. तीन वर्षांपासून सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, माजी सोलापूरचे माजी मंत्री सुभाष देशमुख यांचे चिरंजीव रोहन देशमुख, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे चुलत बंधू प्रसन्नजीत फडणवीस, सचिन पटवर्धन यांनीही उमेदवारीसाठी प्रयत्न चालविले आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीचे आघाडीकडून मिळालेल्या संकेतानुसार हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता आहे. गतवेळी दुसऱ्या स्थानी असलेल्या सारंग पाटील यांनी निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केल्याने अरुण लाड यांचे नाव आघाडीवर असले तरी श्रीमंत कोकाटे, पक्षाचे सरचिटणीस उमेश पाटील, हसन मुश्रीफ यांचे समर्थक प्रताप माने यांनीही कंबर कसली आहे. या तुल्यबळ उमेदवार एकाची निवड करणे हेही आव्हान असणार आहे.

भाजप विरुद्ध आघाडीत संघर्ष

या दोन्ही मतदारसंघांत भाजपचे वर्चस्व असल्याचा दावा पक्षाकडून केला जातो. ही निवडणूक शिक्षक व पदवीधर या दोन्ही मतदारसंघांतील निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवली जाणार असल्याचे संकेत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिले. ‘शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तीन पक्षांचे सरकार आहे. यामुळे या दोन्ही मतदारसंघांत गतवेळी कोणत्या पक्षाचा उमेदवार दुसऱ्या स्थानी होता; त्या पक्षाला उमेदवारी दिली जाण्याची सूत्र वापरात येईल’, असे त्यांनी स्पष्ट केले. पुणे पदवीधर संघात राष्ट्रवादीला उमेदवारी मिळणार असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात चंद्रकांत पाटील विरुद्ध पश्चिम महाराष्ट्रातील आघाडीचे मातबर नेते यांच्यात राजकीय सामना होणार आहे.

शिक्षकांना आमदारकीचे वेध

शिक्षक मतदारसंघात तर इच्छुकांची लांबच लांब रांग लागली आहे. प्रत्येक शिक्षक संघटनेचा एक कोणी ना कोणी प्रतिनिधी निवडणुकीच्या आखाडय़ात उतरल्याचे दिसत आहे. गेल्या वेळी दत्तात्रय सावंत यांनी १३ हजार ९३२ मते मिळवत भाजपचे भगवानराव साळुंखे (९ हजार ६३४ ) यांचा पराभव केला होता. यावेळीही इच्छुक उमेदवारांची मोठी यादी पाहायला मिळत आहे. राज्य शाळा कृती समितीचे माजी आमदार दत्तात्रय सावंत, विनाअनुदान शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जाधव, शिक्षक भारतीचे दादासाहेब लाड, शिक्षक परिषदेचे जितेंद्र पवार, मुख्याध्यापक संघाचे माजी राज्याध्यक्ष सुभाष माने, कृती समितीचे बाबासाहेब पाटील, मुख्याध्यापक संघाचे माजी राज्य अध्यक्ष सुभाष माने, शिक्षण संस्था संघाचे सचिव जयंत आसगावकर, पुरोगामी शिक्षक संघटनेचे जी. के. थोरात, खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्य अध्यक्ष भरत रसाळे, ‘सुटा’चे सुभाष जाधव, राजेंद्र कुंभार यांच्यासह पाच जिल्ह्य़ांतील अनेकांनी समाजमाध्यमातून प्रचाराचा बार उडवला आहे. या मतदारसंघात शिक्षक परिषद, शाळा कृती समिती, पीडीएफ या संघटनांचे वर्चस्व आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2020 12:13 am

Web Title: bjp challenges mahavikas aghadi in pune graduate and teacher constituencies abn 97
Next Stories
1 सामंत, मुश्रीफ यांचा कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांवर पलटवार
2 सीमाभागात काळा दिन
3 कायदा होऊनही ऊस दराबाबत आंदोलन कशासाठी?
Just Now!
X