|| दयानंद लिपारे

चंद्रकांत पाटील यांचे हसन मुश्रीफ तसेच सतेज पाटील यांच्यावर आरोप

कोल्हापूर : राज्यामध्ये सत्तांतर झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्य़ात आजी-माजी मंत्र्यांमध्ये संघर्ष रंगला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष, माजी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरच्या विकासासाठी काहीही भरीव स्वरूपाचे कार्य केले नाही, त्यांनी मोठा निधी  आणला नाही,अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांनी गेल्या आठवडय़ात केली. त्याला प्रत्युत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी मागील सरकारमध्ये केलेली विकास कामे तपासून घ्यावीत असा सल्ला देतानाच दोघा मंत्र्यांच्या आर्थिक प्रगतीवरून टीका केली.

स्कूटरवरून फिरणाऱ्या मुश्रीफ यांच्याकडे स्वत:चा खाजगी साखर कारखाना काढण्यासाठी पैसा आला कुठून? सतेज पाटील यांनी पंचतारांकित हॉटेल कसे उभारले ? असे प्रश्न चंद्रकांतदादांनी उपस्थित केले. त्यास उभय काँग्रेसकडून प्रत्युत्तर दिले गेले. विद्यमान दोन्ही मंत्री मुंबईत असल्याने त्यांच्याकडून अद्याप उत्तर आले नाही.

विकासकामे आणि आक्षेप

कोल्हापूर जिल्हा आजवर काँग्रेस-राष्ट्रवादीचे बहुतांशी मंत्री होते. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचे सरकार आले. चंद्रकांत पाटील यांच्याकडे पहिल्याच टप्प्यात सहकार, सार्वजनिक बांधकाम आणि पुढे महसूल मंत्री पद आल्यानंतर त्यांचा राजकारणातील दबदबा वाढीस लागला. त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर येथे महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, ग्रामपंचायती येथे भाजपला मोठय़ा प्रमाणात यश मिळवून दिले. मात्र ते मंत्री असूनही कोल्हापूरच्या विकासासाठी भरीव निधी आणत नाही असा आक्षेप विरोध घेत होते. तथापि, पाटील यांनी कोल्हापूरचा तीर्थक्षेत्र आराखडा, पर्यटन योजना, रस्ते निर्मिती, सिंचन योजना, पंचगंगा नदी प्रदूषण, विभागीय क्रीडा संकुल अशा अनेक कामांना भरघोस निधी मिळवला असल्याचा दावा सातत्याने केला होता.

दोन्ही काँग्रेसचा लढाऊ  बाणा

भाजप कोल्हापूर महानगर अध्यक्ष निवडीच्या निमित्ताने प्रदेश भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आक्रमक भूमिकेत आले. ‘आपण मंत्री होतो पण ५ इंच जमीनही मिळवली नाही’, असा आपल्या प्रामाणिकतेचा दाखला देत मुश्रीफ – पाटील आर्थिक प्रगतीवर भलेमोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मुश्रीफ हे एके काळी बंद पडणाऱ्या स्कूटरवरून फिरत होते. आता त्यांच्याकडे स्वत:चा खाजगी कारखाना काढण्यासाठी संपत्ती कोठून आली? त्यांच्या कारखान्यांमध्ये कोणी गुंतवणूक केली आहे? मुश्रीफ यांच्या निवासस्थानी प्राप्तिकर खात्याने छापा टाकला, त्यामध्ये नेमके काय आढळले, याचाही खुलासा होणे गरजेचे आहे,’ अशी पाटील यांनी विचारणा केली आहे. ‘राज्य मंत्रिमंडळात विधान परिषद सदस्य मंत्री केले जाणार नाही असे धोरण असताना पैशाच्या राशी ओतून सतेज पाटील यांनी मंत्रिपद मिळवले’ असा आरोप करीत चंद्रकांत पाटील यांनी पंचतारांकित हॉटेल उभे करण्यासाठी पैसा सतेज पाटील यांच्याकडे कोठून आला? असा सवाल उपस्थित करीत त्यांच्या संपत्तीवर प्रश्नचिन्ह लावले आहे. चंद्रकांत पाटील यांनी आरोप केला, तेव्हापासून मुश्रीफ व पाटील हे दोन्ही मंत्री मुंबईत आहेत. मात्र स्थानिक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी चंद्रकांतदादांच्या विधानाचा समाचार घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी करून लढण्याचा बाणा व्यक्त केला. ‘मुश्रीफ यांनी साखर कारखाना उभारला तो कार्यकर्त्यांंना विश्वासात घेऊन आणि सतेज पाटील हे गर्भश्रीमंत आहेत त्यामुळे त्यांच्या संपत्तीबाबत कोणीही बोलू नये. याऐवजी चंद्रकांत पाटील यांनी पाच वर्षांत काय केले त्याचा हिशोब द्यावा. हा कोल्हापूर जिल्हा आहे; पुणे नाही याचे भान त्यांनी ठेवावे,’ अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

नव्या मंत्र्यांचा विकासनामा

महाविकास आघाडीत कोल्हापूर जिल्ह्य़ाला हसन मुश्रीफ, सतेज पाटील, राजेंद्र पाटील असे तीन मंत्री मिळाले आहेत.‘गेल्या पाच वर्षांत कोल्हापूर जिल्ह्य़ाचे प्रश्न रेंगाळले. चंद्रकांत पाटील यांनी निधी आणला नसल्यामुळे कोल्हापूरचा विकास रखडला आहे’, असा आरोप मुश्रीफ यांनी केला होता. तर, ‘कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूरची काळम्मावाडी नळपाणी योजना, जिल्हा परिषद यासाठी  कसलाही निधी चंद्रकांत पाटील यांनी दिला नाही’, असे म्हणत सतेज पाटील यांनी टीकेचा सूर लावला होता.