मावळतीने इशारा दिला एक आणि उगवतीने विजयाची मोहोर उमटवली दुसरीकडेच. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सत्ताकारणात ‘रात्रीस खेळ चाले’ हा प्रयोग भलताच भरात आला. सोमवारी सायंकाळी काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना यांची राजकीय मिसळ उदयास आली आणि मिनी मंत्रालयाचे अध्यक्षपद काँग्रेसकडे जाणार याची चुणूक दिसून आली.

पण रातोरात अशा काही घडामोडी घडल्या, की मंगळवारचा दिवस जिल्हा परिषदेच्या सत्ताकारणात कमळ उगवण्यास कारणीभूत ठरला. राजकारणात कोणत्याही क्षणी काहीही घडू शकते याचा आणखी एक प्रसंग या विलक्षण घडामोडीतून प्रत्ययास आला.

Washim, manuscript Writer, Stabbed, Death, Karanja, Tehsil Office,
दस्तलेखकाच्या मानेवर चाकूने हल्ला, भर तहसील कार्यालय परिसरातच…
Yash Mittal Murder Noida
व्यावसायिकाच्या मुलाची चार मित्रांकडून हत्या; वडिलांकडून मागितली सहा कोटींची खंडणी
transgender gets death sentence
साडी-चोळी दिली नाही, सूड भावनेतून तीन महिन्यांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून खून; तृतीयपंथीयाला फाशीची शिक्षा
ravichandran ashwin profile
व्यक्तिवेध : रविचंद्रन अश्विन

महिन्यापूर्वी जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजप व मित्रपक्ष यांचे संख्याबळ जवळपास एकसमान म्हणजे २५ इतके होते. ६७ सदस्यांच्या सभागृहात अध्यक्षपदी विराजमान होण्यासाठी ३४ मतांची गरज होती. महिनाभर राजकीय कसरत करूनही हा जादुई आकडा ना काँग्रेस गाठू शकली ना भाजप.

सोमवारचा दिवस जिल्हा परिषदेच्या राजकारणात खळबळजनक ठरला. १० सदस्य असलेल्या शिवसेनेने दिवस मावळता मावळता आपला पाठबा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पारडय़ात टाकला.  लगोलग काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेच्या नेत्यांनी हसतमुखाने एकत्र येत हात उंचावून जिल्हा परिषदेत आमचीच सत्ता येणार असा कौल दिला. पण रात्रीच्या गर्भात काही वेगळेच घडायचे होते.

जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून नाराज झालेल्या काँग्रेसचे माजी मंत्री प्रकाश आवाडे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी रात्री उशिरा भाजपसोबत जाणार असल्याचे येथे घोषित केले.

चार सदस्य हाती लागल्याने सुरुवात तर उत्तम झाल्याने भाजपच्या गोटात हायसे वाटू लागले.

तर तिकडे शिवसेनेच्या छावणीत सारेच काही आलबेल नव्हते. सहसंपर्कप्रमुख संजय मंडलिक यांनी सेनेच्या दहा सदस्यांचा पाठबा काँग्रेसला असल्याचे जाहीर केले. पण त्यांचा निर्णय न जुमानता चंद्रदीप नरके, डॉ. सुजित मिणचेकर व सत्यजित पाटील या तिघा आमदारांनी आपल्या ७ सदस्यांची कुमक कराड मुक्कामी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सदरी दाखल केली. बंडखोर काँग्रेस, स्वाभिमानी व शिवसेना यांचे ११ सदस्य भाजपकडे दाखल झाल्याने विजयाचा आत्मविश्वास प्रत्येकाच्या चेहऱ्यावर चमकू लागला.

अशातच काँग्रेस व राष्ट्रवादीच्या प्रत्येकी एक अशा दोन सदस्यांना अनुपस्थित ठेवण्याची खेळी रात्रीत घडली. साहजिकच भाजपला आणखीनच बाळसे चढले. रात्रीत एकापाठोपाठ एक घडू लागलेल्या घटना आणि त्यातून मिळत चाललेले पाठबळ यामुळे सायंकाळपासून बॅकफूटवर गेलेल्या भाजपला पहाटे मात्र विजयाचा शुक्रतारा चमकताना दिसू लागला आणि मंगळवारी सायंकाळी झालेल्या सभेत त्यावर विजयाची मोहोर उमटवली गेली. मिनी मंत्रालयावर भाजपचा झेंडा रोवणारे आणि ताकद वाढवणारे आणि गेल्या अनेक वर्षांची काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता उखडून टाकणारी ही घटना घडण्यास एका रात्रीचे राजकारण अधिक महत्त्वपूर्ण ठरले.

कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी शौमिका महाडीक

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत इतिहास घडवत भाजपाने मिनी मंत्रालयावर आपले निशाण रोवले. अध्यक्षपदाची ऑफर असताना शिवसेनेत फूट पडली. तीन आमदारांच्या गटाने भाजपाशी जवळीक साधत उपाध्यक्षपद मिळविले. अडीच वर्षांपूर्वी हुकलेले अध्यक्षपद शौमिका महाडीक यांच्या रूपाने मिळवण्यात माजी आमदार महादेवराव महाडीक, त्यांचे पुत्र आमदार अमल महाडीक यशस्वी ठरले. आमदार चंद्रदीप नरके गटाचे सर्जेराव पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. या दोघांना ३७ तर त्यांच्या प्रतिस्पध्र्याना २८ मते मिळाली. काँग्रेस व राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक असे दोन सदस्य अनुपस्थित ठेवण्यातही भाजपाचे राजकारण यशस्वी ठरले.

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी कोण निवडले जाणार यावरून मोठी उत्कंठा ताणली गेली होती. समान संख्याबळ असल्याने अखेरच्या क्षणी कोण बाजी मारणार याकडे लक्ष वेधले गेले होते. ६७ मतांपकी ३४ मते मिळवणाऱ्या पक्षाकडे अध्यक्षपदाची खुर्ची जाणार होती. अशातच शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करण्याचा दावा केला. त्यामुळे ही नवी राजकीय मिसळ बाजी मारणार असे चित्र निर्माण झाले. परंतु त्याला शिवसेनेतूनच छेद मिळाला. आमदार चंद्रदीप नरके, सुजित मिणचेकर, सत्यजित पाटील यांनी सवतासुभा मांडत थेट पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी बोलणी केली. पाटील यांनी त्यांना उपाध्यक्षपद देऊ केले. त्याला या तिघांनी होकारही भरला. शिवसेनेची फूट लक्षात येऊ लागल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांनाच अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याची गळ घातली. मात्र त्यालाही नकार दर्शविला गेला. भाजपा व मित्रपक्षांचे सदस्य सोमवारी रात्री कराड येथे होते. त्यांना शिवसेनेचे ७, काँग्रेसच्या आवाडे गटाचे २, खासदार राजू शेट्टी यांचे २ असे ११ सदस्य मिळाले. त्यामुळे भाजपाचे संख्याबळ ३७ पर्यंत वाढले.

भाजपा व मित्रपक्षांचे सदस्य दुपारी सभागृहात लाल रंगाचे फेटे बांधून आले. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे शौमिका महाडीक या विजयी झाल्या. त्याचीच पुनरावृत्ती उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत होऊन सर्जेराव पाटील यांचीही निवड झाली. अध्यक्षपदासाठी काँग्रेसने ज्येष्ठ सदस्य बंडा माने तर उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीने जयवंत िशपी यांना संधी दिली होती. पण सत्ताकारणातील बदलेल्या समीकरणामुळे विजयासमीप पोहोचलेली काँग्रेस-राष्ट्रवादी वर्तुळाबाहेर फेकली गेली. महाडीक व पाटील यांच्या विजयानंतर भाजपाच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. दोघेही निवडल्याचे कळल्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आगमन झाले. त्यांनी नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांचे अभिनंदन केले. या विजयाबद्दल बोलताना ते म्हणाले, केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आहे. याचा फायदा जिल्हा परिषदेत विकासकामे करण्यासाठी निश्चितपणे होणार आहे. नियोजनबध्द व नावीन्यपूर्ण कामे करुन जिल्हा परिषद नावारूपाला आणण्याचा भाजपाचा प्रयत्न राहील.

शिवसेनेत दुफळी

शिवसेनेमध्ये उघडपणे दोन गट पडले आहेत. याबाबत संजय पवार, विजय देवणे व मुरलीधर जाधव या तिन्ही जिल्हाध्यक्षांनी आपला अहवाल पक्षनेते उद्धव ठाकरे यांना पाठवला आहे.

स्वहितासाठी आणि क्षणिक मोहापायी पक्षाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यामध्ये केली आहे. शिवसेनेला अध्यक्षपदाची सुर्वणसंधी प्राप्त झाली होती. पण पक्षादेश मानणाऱ्यांच्या मनात काळेबेरे निर्माण झाल्यामुळे मोठय़ा संधीला हुकावे लागल्याची चीड, यातून व्यक्त करण्यात आली आहे.

धनंजय महाडीक यांचे सारथ्य

भाजपाने मित्रपक्षांसह सत्तेत येण्याची तयारी चालविली असताना त्याला काँग्रेस-राष्ट्रवादीकडून जशास तसे प्रत्युत्तर दिले जात होते. मात्र आज मतदानाच्या दिवशी भलतेच चित्र दिसून आले.

भाजपा व मित्रपक्षांचे सदस्य बसलेल्या बसचे सारथ्य चक्क राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडीक यांनी केले. निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी खासदार महाडीक यांना उद्देशून आपला पक्ष कोणता तो जाहीर करावा असे खुले आव्हान दिले होते. या पाश्र्वभूमीवर भावजयीच्या अध्यक्षपदासाठी सारथ्य करणारे खासदार महाडीक राजकीय पेचात सापडले असून राष्ट्रवादीतील धुसफूस चव्हाटय़ावर आली आहे.