16 October 2019

News Flash

बडय़ा नेत्यांची कोंडी करण्याची भाजपची खेळी

मुख्यमंत्री उद्या कोल्हापूर दौऱ्यावर; पश्चिम महाराष्ट्रावर लक्ष

|| दयानंद लिपारे

मुख्यमंत्री उद्या कोल्हापूर दौऱ्यावर; पश्चिम महाराष्ट्रावर लक्ष

विरोधी पक्षातील बडय़ा नेत्यांची त्यांच्याच मतदारसंघात कोंडी करण्याची खेळी लोकसभा निवडणुकीत यशस्वी झाल्याने हाच प्रयोग सत्ताधारी भाजपच्या वतीने विधानसभा निवडणुकीत केला जाणार आहे. यातूनच पश्चिम महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांच्या मतदारसंघांचा आढावा सध्या घेतला जात असून, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, कोल्हापूरमधील हसन मुश्रीफ या नेत्यांची कोंडी करण्याची भाजपची व्यूहरचना आहे.

पश्चिम  महाराष्ट्रातील व्यापक रणनीतीची सुरुवात कोल्हापुरातून करण्याचे भाजपाचे धोरण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गुरुवारच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याकडे याच भूमिकेतून पहिले जात आहे. राजर्षी शाहू महाराज यांच्या जनक घराण्याचे वारसदार म्हाडा पुणेचे अध्यक्ष समरजितसिंहराजे घाटगे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमानिमित्त त्यांना राजकीय ताकद देण्याचे नियोजन आहे. यायोगे कोल्हापूर जिल्ह्य़ातील राष्ट्रवादी काँग्रेसचे वजनदार नेते, आमदार हसन मुश्रीफ यांना रोखण्याचा प्रयत्न आहे.

लोकसभा निवडणुकीत देशात महायुतीला घवघवीत यश मिळाले. महाराष्ट्रातही महायुतीने जबरदस्त यश प्राप्त केले. आता गेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा अधिक यश मिळवण्याचा इरादा युतीचे कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत. गेल्या वेळी भाजप आणि शिवसेनेने स्वतंत्र निवडणूक लढवली. तरीही सत्ता प्राप्त करण्याइतके यश मिळवले. आता तर एकत्रित निवडणुका लढवल्या जाणार असल्याचे सूतोवाच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गेल्या आठवडय़ात कोल्हापुरात स्पष्ट केले होते. केवळ एकसंधपणे निवडणूक न लढवता काँग्रेस – राष्ट्रवादीतील बडय़ा नेत्यांना लक्ष्य करण्याची रणनीती आखली जात आहे.

शाहूंच्या वंशजांना राजकीय बळ

कागल तालुक्यात दिवंगत आमदार विक्रमसिंह घाटगे यांच्या छत्रपती शाहू कारखान्याने सहकारी साखर कारखानदारीतील मोठे नाव कमावले. त्यांच्या पश्चात या कारखान्याची जबाबदारी त्यांचे पुत्र समरजिंतसिंह घाटगे यांच्याकडे आली. त्यांच्यातील नेतृत्व पाहून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांना भाजपात आणले. घाटगे यांच्याकडे म्हाडाच्या पुणे विभागाचे अध्यक्षपद सोपवले. भाजपाने राजर्षी शाहू महाराज यांच्या वंशजांना भाजपच्या गोटात आणले. सुरुवातीला वारस घराण्यातील संभाजीराजे छत्रपती आणि नंतर जनक घराण्यातील समरजितसिंह घाटगे यांना सामावून घेऊन पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणात वेगळा संदेश दिला. संभाजीराजे यांना देण्यात आलेले राज्यसभा सदस्यत्व तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जिव्हारी लागल्याचे त्यांच्या त्या वेळच्या विधानातून दिसून आले होते. आता, याच समरजितसिंह घाटगे यांना राजकीय बळ देण्याचे भाजपने ठरवले आहे. घाटगे यांनी आयोजित केलेल्या तिसऱ्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री फडणवीस कागलला येत आहेत. निमित्त स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्याचा अनावरण समारंभाचे असले तरी घाटगे यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी ताकद देण्याचे नियोजन आहे. कागल मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ सातत्याने निवडून येत आहेत. कोल्हापूर जिल्ह्य़ात राष्ट्रवादीची खरी ताकद मुश्रीफ हेच आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना जिल्ह्य़ात सातत्याने आव्हान देण्याचे धाडस केवळ मुश्रीफ हे करीत आहेत. पाटील यांना मुश्रीफ यांना रोखायचे असल्याने ते घाटगे यांच्या पाठीशी उभे आहेत. आता त्याला मुख्यमंत्री फडणवीस यांची साथ मिळत असल्याने कागलचा आखाडा आतापासून घुमू लागला आहे. समरजितसिंह घाटगे यांच्या बरोबरीने शिवसेनेत असलेले माजी आमदार संजय घाटगे यांनीही आधीपासूनच निवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत. त्यामुळे दोघांपैकी एका राजेंची मनधरणी करण्याचे कामही या दौऱ्यात फडणवीस, पाटील यांना करावे लागणार आहे.

बडय़ा नेत्यांना रोखण्याचे नियोजन

विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने विरोधी काँग्रेस – राष्ट्रवादीच्या बडय़ा नेत्यांची नाकेबंदी करण्याची रणनीती आखली आहे. याची उजळणी लोकसभा निवडणुकीत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्रात यशस्वीपणे केली. सुशीलकुमार शिंदे, राजू शेट्टी, धनंजय महाडिक यांना पुन्हा संसदेत जाण्यापासून रोखले, तर सुप्रिया सुळे यांच्या पराभवासाठी बारामतीत दीर्घकाळ ठाण मांडले होते. पार्थ पवार ही पवार घराण्याची नवी पाती पहिल्याच निवडणुकीत पराभूत झाली. हाच धडाका विधानसभा निवडणुकीत राबवण्याचा पाटील यांचा मनसुबा आहे. पश्चिम महाराष्ट्रातील बडय़ा नेत्यांवर त्यांची नजर आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघात गेल्या वेळी राज्यात सर्वाधिक मताधिक्य मिळवत विक्रम प्रस्थापित केला होता. बारामतीत अजितदादा, सातारा जिल्ह्य़ात काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सांगली जिल्ह्य़ात राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, कोल्हापूर जिल्ह्य़ात हसन मुश्रीफ हे प्रमुख नेते भाजपने लक्ष्य केले आहेत. सरसेनापती रोखले की सेनापतींना आवरणे कठीण नाही, अशी यामागील योजना आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांच्या दक्षिण कराड मतदारसंघात युतीला अधिक मते मिळाली. हाच कल विधानसभा निवडणुकीत कायम ठेवण्याचा युतीचा प्रयत्न आहे.

First Published on June 13, 2019 12:49 am

Web Title: bjp in kolhapur 2