कोल्हापूर जिल्ह्य़ातील साखर कारखाना निवडणुकीत दोन्ही पक्षांच्या आघाडीला यश

साखर कारखान्यातील सत्तेच्या गोडीने एकत्र आलेल्या राष्ट्रवादी – भाजप यांच्या आघाडीने बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत शुभ्र साखरेसारखे निर्वविाद यश मिळवत विजयश्री खेचून आणली. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारीत  भाजपचा परीघ महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुरेश हाळवणकर यांच्या प्रयत्नाने वाढला आहे. याचवेळी सत्तासंग करताना भाजपचे संचालक साखर कारखानदारीतील ‘कारभारात’ किती पारदर्शकपणे काम करणार याला महत्व प्राप्त झाले असून यातूनच भाजपच्या सहकारातील शुद्धीकरणाची गंगा कशी वाहणार याचा प्रत्यय येणार आहे.

बिद्री (ता. कागल) येथील दुधगंगा-वेदगंगा साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजपाने  राष्ट्रवादीशी घरोबा केला होता. जिल्ह्य़ात राजकीय आखाडय़ात एकमेकांना सतत भिडणारे हे पक्ष साखरेच्या गोडीच्या  निमित्ताने का असेना, पण एकत्रित आल्याने खळबळ उडणे स्वाभाविक होते. त्यामुळे प्रतिस्पर्धी गोटात  शिवसेनेने काँग्रेसशी हातमिळवणी केली. निकालाचा कल पाहता भाजपच्या सोबतीचा सत्ता कायम राखण्यासाठी राष्ट्रवादीला फायदा झाला. भाजपचे सहा संचालक साखरपेरणीच्या कारभारात मुरलेल्या राष्ट्रवादीच्या १५ संचालकांची सोबत करताना दिसतील. भाजप सोबत नसती तर निकालाचे आकडे आणि रंगही बदललेला दिसला असता.

भाजपची साखर कारखानदारीत मुसंडी

विरोधात असताना भाजपच्या कट्टर कार्यकर्त्यांला साखर कारखान्याचे संचालकपद तर सोडाच, उलट निवडणुकीत कुठे खोडा यायला नको म्हणून सभासदही करण्याकडे टाळाटाळ केली जात असे. हे चित्र भाजप सत्तेतील थोरला भाऊ बनल्यानंतर बदलले. त्यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुरेश हाळवणकर यांनी विचारपूर्वक टाकलेले डावपेच यशस्वी झाले. गडिहग्लज येथील अप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखान्याच्या  निवडणुकीत  चंद्रकांत पाटील नेतृत्वाखालील  आघाडीने ८ जागांवर विजय मिळवला . पाठोपाठ आजरा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजपप्रणीत महाआघाडीने मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली आघाडीला नमवून  सत्ता प्राप्त केली. साखर कारखानदारीत पाटील – मुश्रीफ यांचा सामना बरोबरीत सुटला पण बिद्रीच्या निवडणुकीत दोघांनी  चक्क गळामिठी मारली. बिद्रीत  भाजपचे  साखर कारखानदारीत स्थान आणखी भक्कम झाले, पण वरचष्मा मात्र मुश्रीफ – के . पी . यांचा राहणार आहे . विरुद्ध स्वभावाच्या जोडीच्या संसारात कितपत गोडी लागणार हेही आता महत्त्वाचे बनले आहे.

सहकारात एकी राजकारणात दुही

बिद्रीचा सहकाराचा गड  राष्ट्रवादी – भाजप यांनी राखला असला तरी राजकीय आखाडय़ात दोन्ही पक्ष दंड थोपटत एकमेकांना आव्हान देणार हेही तितकेच खरे. दोन्ही पक्षांना आपली जिल्ह्यातील घडी अधिक भक्कम करायची असल्याने त्यांच्यातील संघर्ष अटळ आहे. त्याची सुरुवात बिद्रीच्या कार्यक्षेत्रात असलेल्या राधानगरी- भुदरगड विधानसभा मतदारसंघात पाहायला  मिळेल. पालकमंत्री पाटील यांनी येथे भाजपचा आमदार निवडून येईल, असे वारंवार सांगितले आहे. खुद्द पाटील यांनीच येथून निवडणूक लढवावी, असा येथील कार्यकर्त्यांच्या आग्रह आहे. दुसरीकडे माजी आमदार के. पी . पाटील यांना सत्ता मिळाल्याने त्यांची पुन्हा आमदार होण्याची इच्छा प्रबळ झाली आहे. त्यांना आमदार आबिटकर यांचे आव्हान असणार आहे. कारखाना निवडणुकीत सेनेचा पराभव झाला असला तरी आबिटकर , सेनेचे लोकसभेचे उमेदवार संजय मंडलिक, काँग्रेसचे माजी आमदार दिनकरराव जाधव यांच्या आघाडीने घेतलेली मते उल्लेखनीय आहेत. आबिटकर यांना ही मते ऊर्जा देणारी आहेत. पण चंद्रकांत पाटील यांना उद्देशून आबिटकर यांनी केलेली विधाने पाहता काटा काढण्याचे राजकारण धुमसत राहणार. खेरीज, लोकसभा – विधानसभा निवडणुकीवेळी राजकीय समीकरणे कशी वळणे घेतात यावर राजरंग बदलत राहणार आहे. बिद्रीची लढाई संपली असली तरी कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय खणाखणी आखाडा तापवत ठेवणार यात संदेह नाही.

सहकारातील शुध्दीकरणाची कसोटी

साखर कारखानदारीत कारभार किती ‘चोख ’ असतो यावर रकानेच्या रकाने भरून लिहिले आणि बोललेलेही गेले आहे. बिद्रीच्या निमित्ताने भाजपच्या सहकारातील शुद्धिकरण तत्त्वाची कसोटी लागणार आहे . सत्तासंग करताना शुध्दीकरण तत्त्वापासून अभंग राहणार का, हाच भाजपासमोर महत्वाचा प्रश्न असणार आहे . भाजपचे हाळवणकर हे मात्र आमच्याकडून पारदर्शक कारभार होईल, याची हमी देताना दिसतात. बिद्रीवर दोन वष्रे प्रशासक असताना गरकारभार घडला नाही. हेच आमच्या संचालकांकडून यापुढे होत राहील. कारखान्याच्या कारभारावर भाजपच्या संचालकांचे नियंत्रण असल्याने चुकीचे काही होणार नाही. आमचे संचालक अशुद्ध होणार नाहीत , याची खात्री आहे .बिद्रीच्या विस्तारासह अनेक कामांना हात घालायचा असल्याने दोन्ही बाजूच्या संचालकांमध्ये सुसंवाद नक्की दिसून येईल, असे आमदार सुरेश हाळवणकर यांनी ‘लोकसत्ता’ सांगितले.