10 July 2020

News Flash

मुंबई हल्लय़ाच्या फेरतपास मागणीमागे भाजपचे राजकारण – सतेज पाटील

मुंबई येथे दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्लय़ावरून भाजपने फेरतपास करण्याची मागणी केली आहे.

कोल्हापूर : राज्याच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये भाजपच्या विरोधातील अनेक विषय उपस्थित होणार आहेत. यामुळेच मुंबईतील दहशतवादी हल्लय़ाच्या फेर तपासाची मागणी करणारे विषय भाजप उपस्थित करीत आहे. यामागे त्यांची निव्वळ राजकीय भूमिका असून मागणीत काहीच अर्थ नाही, अशा शब्दात गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी यांनी गुरुवारी येथे भाजपवर निशाणा साधला.

मुंबई येथे दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्लय़ावरून भाजपने फेरतपास करण्याची मागणी केली आहे. याविषयी पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, की मुंबईतील दहशतवादी हल्ला झाल्यानंतर आरोपींना तातडीने पकडण्यात आले. अशा प्रकारचा भयावह हल्ला झाल्यानंतर जगाच्या पाठीवर आरोपींना तत्काळ पकडण्याच्या कारवाईतील ही एक कारवाई होती. त्याचा तपास अधिकाऱ्यांनी पूर्ण केला. त्यातून आरोपींना आपल्या भूमीत फाशीची शिक्षा होण्यापर्यंत अधिकाऱ्यांनी चोख काम बजावले. या सर्व प्रक्रियेवर तुम्ही शंका का घेत आहात, असा प्रश्न पाटील यांनी केला. या प्रकारांमुळे जे शहीद झाले. ज्यांनी बलिदान दिले. त्यांच्यावर शंका उपस्थित करण्यासारखे आहे, असे सांगत पाटील म्हणाले, की निव्वळ राजकारण करायचे हाच यामागे भाजपचा उद्देश दिसतो. आगामी अधिवेशनात भाजपच्या विरुद्ध अनेक विषय येणार असल्याने नको ते विषय काढून त्याविषयी वेगळे वातावरण निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तथापि या दहशतवादी हल्लय़ाचा योग्य रीतीने तपास होऊन आरोपींना कठोर शिक्षाही झाली असल्याची लोकांना पूर्ण कल्पना आहे.

दाभोलकर, पानसरे हल्ल्याचा नित्य आढावा

नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याच्या तपासाच्या विलंबबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. या विषयी बोलताना सतेज पाटील म्हणाले, की गेल्या पाच वर्षांत काही मागेपुढे झाले असेल. मात्र, आता मी स्वत: या प्रकरणांमध्ये लक्ष घातले आहे. याचा दर आठवडय़ाला आढावा घेतला जाणार आहे. या प्रकरणाच्या तपासाची प्रगती बऱ्याच अंशी चांगली आहे. पण त्याची माहिती माध्यमांना देता येणार नाही. याबाबत निश्चिततेच्या आधारे निष्कर्षांवर येणे अभिप्रेत आहे. ते काम लवकरच होईल. दाभोलकर, पानसरे यांची खुनी आणि त्यांचे सूत्रधार यांच्यापर्यंत निश्चितपणे लवकरच पोहोचू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2020 1:45 am

Web Title: bjp politics behind the demand of mumbai attack investigation says satej patil zws 70
Next Stories
1 सूतगिरण्यांसमोर अडचणींचा डोंगर कायम
2 देशातील १५ कोटी मुस्लिमांचा ठेका तुम्हाला कोणी दिला?
3 …म्हणून भाजपाकडून २६/११च्या हल्ल्याच्या चौकशीची मागणी -गृहराज्यमंत्री
Just Now!
X