कोल्हापूर : कल सतत बदलत राहणाऱ्या बेळगाव लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत निसटता विजय संपादन करीत भाजपने हा मतदारसंघ कायम राखला. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराने सव्वा लाख मते घेत लक्षणीय कामगिरी के ली.
बेळगावचे खासदार आणि
रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगाडी यांचे करोनामुळे निधन झाल्याने या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. अंगाडी यांच्या पत्नी आणि भाजप उमेदवार मंगला अंगाडी यांनी काँग्रेसचे माजी मंत्री सतीश जारकीहोळी यांचा पाच हजार मतांनी पराभव के ला. महाराष्ट्र एकीकरण समितीचे शुभम शेळके यांना सव्वा लाखांच्या आसपास मते मिळाली.
मे २०१९ मध्ये लोकसभा लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत बेळगाव जिल्ह्यातील तीनही जागा भाजपने जिंकल्या होत्या. बेळगाव मतदारसंघात सुरेश अंगडी यांनी दीड लाखाहून अधिक मताधिक्य मिळवून सलग चौथ्यांदा निवडणूक जिंकली होती. पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नीला निसटता विजय मिळाला. काँग्रेसने बेळगाव जिल्ह्यातील बडे प्रस्थ सतीश जारकीहोळी यांना रिंगणात उतरविल्याने लढत चुरशीची झाली. भाजपच्या विजयासाठी डझनभर मंत्री मतदारसंघात ठाण मांडून बसले होते.
भाजपने सुरुवातीला या मतदारसंघात आघाडी घेतली होती. त्यानंतर काँग्रेसने मताधिक्य प्राप्त केले. कधी भाजप तर कधी काँग्रेस यांची आघाडी होत राहिल्याने निकालाकडे लक्ष लागले होते.