कोल्हापूर : राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून पश्चिम महाराष्ट्रात आघाडीची घोडदौड सुरू राहिली होती. पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघ आणि सांगली महापौरपदाच्या पराभवामुळे भाजपची पिछेहाट सुरू झाली होती.  पंढरपूरच्या विजयाने आघाडीला भाजपने रोखले आहे.

पश्चिम महाराष्ट्र सुरुवातीपासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात घडय़ाळाची टिकटिक प्रभावी ठरली. राष्ट्रवादी- काँग्रेसची स्पर्धा सुरू असताना शिवसेनेने कोल्हापूर व आसपास आपला प्रभाव दाखवला होता. या राजकीय परिघात भाजपचे स्थान नगण्य होते. २०१४ सालच्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी यांच्या प्रभावामुळे राज्यात भाजपचे बळ वाढले. यातूनच पश्चिम महाराष्ट्रातील भाजपच्या विस्तार वाढीस लागला. देवेंद्र फडणीस यांच्या सरकारमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील चंद्रकांत पाटील, सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, सदाभाऊ खोत आदींना महत्त्वाची मंत्रिपदे देण्यात आली. सत्तेचा फायदा उचलत उभय काँग्रेसमधील अडचणीत आलेल्या सहकार – साखरसम्राट यांना भाजपकडे वळवले. यातून भाजपच राजकीय प्रभाव वाढत राहिला. सांगली, सोलापूर महापालिकेत भाजपची ताकद वाढली. पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांमध्ये भाजपचा वरचष्मा राहिला. नगरपालिका, ग्रामपंचायत येथेही कमळ फुलले. सत्तेत असूनही शिवसेनेला प्रभाव दाखवता आला नाही. एकेकाळी बलाढय़ असलेल्या दोन्ही काँग्रेसला मरगळ आली.

 महाविकास आघाडीचा दबदबा

गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर हे चित्र बदलताना बदलू लागले. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या तिन्ही पक्षाचे मंत्री होते. कोल्हापुरात हसन मुश्रीफ, सतेज पाटील, राजेंद्र पाटील यड्रावकर, सांगलीत जयंत पाटील, विश्वजीत कदम, सातारा जिल्ह्य़ात बाळासाहेब पाटील, शंभूराजे देसाई या मंत्र्यामुळे आणि तीन पक्ष एकत्रित आल्याने महाविकास आघाडीचा पश्चिम महाराष्ट्रात दबदबा वाढीस लागला. त्याचा प्रत्यय निवडणुकातून दिसून आला. पुणे पदवीधर मतदारसंघात सांगलीचे राष्ट्रवादीचे अरुण लाड तर शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे प्रा. चंद्रकांत आसगावकर यांनी विजय मिळवला. भाजपकडे असलेला हा मतदारसंघ गमावल्याने त्यांना धक्का बसला. तर, फेब्रुवारी महिन्यामध्ये सांगली महापालिकेतील सत्तानाटय़ घडले. या महापालिकेत भाजपकडे सर्वाधिक ४१ जागा होत्या. पक्षांतर्गत नाराजीचा फायदा उठवत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व काँग्रेसचे विश्वजीत कदम या मंत्र्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केला. येथे राष्ट्रवादीचा महापौर तर काँग्रेसचा उपमहापौर झाल्याने भाजपला सत्तास्थान गमवावे लागले. पाठोपाठ सांगली जिल्हा परिषदेतील भाजपच्या गडाला हादरे देण्याची रणनीती आखली जात आहे. या यशामुळे पश्चिम महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे प्रभुत्व सर्वार्थाने दिसून आले होते. भाजपला धक्का देण्यासाठी शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील आदींनी राजकीय व्यूहरचना आखली.

पंढरपूरच्या निकालाने सामना बरोबरीत

महाविकास आघाडीची पश्चिम महाराष्ट्रात घोडदौड सुरू असताना त्याला पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक निकालाने लगाम बसला आहे. आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीने त्यांचे पुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली. भाजपने मुत्सद्देगिरीचे धोरण अवलंबत अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांना आपल्या गोटात ओढले. भाजपच्या जिल्ह्य़ातील नेत्यांची एकजूट केली. परिणामी समाधान आवताडे यांच्या विजयाने पंढरीत प्रथमच कमळ फुलल्याने भाजपला ताकद मिळाली आहे. राज्यात ठाकरे सरकार स्थापन झाल्यापासून सातत्याने पिछाडीवर जाणाऱ्या भाजपला उभारी मिळाली आहे. तिन्ही पक्ष एका बाजूला असताना ही भाजपने एकाकी झुंज देत मिळवलेले यश उल्लेखनीय ठरले आहे. भाजपला धोबीपछाड करू पाहणाऱ्यांवरच हा डाव उलटवण्यात भाजपची समीकरणे यशस्वी ठरली. या निकालामुळे महाविकास आघाडीला ताळ्यावर आणले आहे. भाजपला यश मिळाले असले तरी पुढची वाटचाल सोपी असणार नाही.