20 January 2019

News Flash

‘चांदीनगरी’तील विजयाने भाजप जिल्हय़ात अग्रस्थानी

या निवडणुकीत काँग्रेसप्रमाणे शिवसेनेलाही जबर धक्का बसला.

भारतीय जनता पार्टी ( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

काँग्रेस-राष्ट्रवादीला मागे टाकत यश

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये विजयाची कमान उंचावत राहणाऱ्या भाजपने चांदीनगरी हुपरी नगरपालिकेच्या निवडणुकीत बाजी मारून आपला यशाचा मार्ग आणखी प्रशस्त केला आहे.  कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपालिका, जिल्हा परिषद-पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला मागे टाकत प्रथम क्रमांकाचा पक्ष म्हणून सिद्ध केले होते. आता या ताज्या यशाने त्यावर मुकुट चढवला गेला आहे.

चांदीच्या कलाकुसरीत देशभर लौकिक मिळवलेल्या हुपरी गावाचा विकास अलीकडच्या काही वर्षांत झपाटय़ाने झाला. शहराची लोकसंख्या ५० हजाराच्या घरात गेली. येथील चांदी उद्योगही सतत वाढत राहिला. बाहेरगावाहून, परराज्यातून येणाऱ्यांच्या हातांना काम देण्यात हुपरीने कधी कुचराई केली नाही. श्रीमंतीची शाल पांघरलेल्या या गावातील ग्रामपंचायत वाढत्या लोकसंख्येला नागरी सुविधा पुरवण्यात अपुरी पडली. त्यातून हुपरी नगरपालिकेची मागणी जोर धरली. त्या शासनाने ही मागणी वर्षांपूर्वी मान्य  केल्यानंतर याच चांदीनगरीत पहिली नगरपालिकेची निवडणूक पार पडली.

हाळवणकरांचे यश-आवाडेंना धक्का

हुपरी परिसरावर माजी मंत्री आवाडे यांचे वर्चस्व होते, पण या निवडणुकीत धवल यश मिळवत भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी इचलकरंजीप्रमाणेच हातकणंगले तालुक्यातील याही नगरपालिकेवर भाजपची ताकद असल्याचे दाखवून दिले. नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या जयश्री महावीर गाट या पंचरंगी लढतीत मोठय़ा मताधिक्याने विजयी झाल्या. शिवाय, १८ जागांपैकी भाजपने ७ जागांवर विजय मिळवत नगरपालिकेवर भाजपने झेंडा फडकवला. हुपरीचा निकाल हा हाळवणकरांचे यश आणि आवाडेंना धक्का या स्वरूपाचा राहिला.

शिवसेनेला मनसे भारी

या निवडणुकीत काँग्रेसप्रमाणे शिवसेनेलाही जबर धक्का बसला. सेनेच्या जिल्हाप्रमुखांच्या सौभाग्यवती त्यांच्यात गावात मोठय़ा फरकाने पराभूत झाल्या. त्यांच्यापेक्षा नगण्य ताकद असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) अधिक मते खेचली. शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होऊनही तोडपाण्याच्या राजकारणामुळे सेनेचे नाक कापले गेल्याचे येथे दिसून आले.

First Published on December 17, 2017 2:29 am

Web Title: bjp won hupari municipal council election