भाजपचे बेरजेचे गणित यशस्वी

‘आपलेच  राज्य आहे ‘ या आविर्भावात राहिलेल्या  काँग्रेस – राष्ट्रवादीच्या कोल्हापूर जिल्ह्यातील सुभेदारांना भाजपने जोरदार मुसंडी मारत गढीला जबरदस्त धक्का दिला.  जिथे नगरसेवक निवडून आणण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागायचे त्या भाजपने मित्रपक्षासह ३ नगराध्यक्ष निवडून आणण्याची किमया केली. बेरजेचे गणित मांडत का असेना, पण भाजपने नगरपालिका निवडणुकीत लक्षणीय यश मिळवले.  बेसावध, तयारीविना आणि असंघटितरीत्या निवडणूक लढवल्यास आपले भक्कम गड कसे ढासळून पडतात याचा धडा या निवडणुकीने दोन्ही काँग्रेसला दिला आहे. तद्वत, जिल्हा परिषद निवडणुकीत काय वाढून ठेवले आहे याचा वस्तुपाठही त्यांना मिळाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्याच्या नगरपालिका निवडणुकीत सत्तापालट झाला आहे. थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक घेण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खेळी जिल्ह्यात कमालीची यशस्वी ठरली आहे. सर्वात मोठया इचलकरंजी पालिकेत भाजपच्या अ‍ॅड. अलका स्वामी यांनी, तर मलकापूर मध्ये याच पक्षाचे अमोल केसरकर नगराध्यक्षपदी विजयी झाले. या पक्षाची आघाडी असलेल्या ताराराणी आघाडीच्या डॉ. नीता माने या नगराध्यक्ष बनल्या .

भाजप – मित्रपक्षाचे हे यश नगरपालिका या आपलीच सुभेदारी समजत बेफिकीर राहिलेल्या आणि पालिकांचा बेबंद कारभार करणाऱ्या दोन्ही काँग्रेसला डोळ्यात अंजन घालणारा आहे. लोकसभा – विधानसभा निवडणुकीत जोरदार तडाखा बसल्यानंतरही कसलेही शहाणपण न आलेल्या जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांना नगरपालिका क्षेत्रातील उरली सुरली मुळेही उद्ध्वस्त होताना पाहावे लागले असल्याचेच निकालाने दाखवून दिले आहे.

सर्व ९ नगरपालिकांमध्ये भाजपचा नगराध्यक्ष निवडून आणण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती. त्याच्या निम्मेही यश पक्षाला मिळाले नाही. पण ज्या गतीने पालिका क्षेत्रात कमळ उगवले आहे ते विरोधकांच्या – प्रस्थापितांच्या पोटात गोळा आणणारे आहे. यापूर्वी एखादा नगरसेवक निवडून आला तरी डोक्यावरून पाणी अशी अवस्था पालिकांमध्ये भाजपची होती. पण  या निवडणुकीसाठी भाजप ज्या संघटित, नियोजनबद्धरीत्या सामोरे गेला त्याचे हे धवल  यश आहे. उभय काँग्रेसचे निवडून येण्याचे नामी अस्त्र त्यांनी हेरले आणि योग्य ठिकाणी योग्य ती रसद त्यांनी व्यवस्थितपणे पुरवली.

याउलट चित्र दोन्ही काँग्रेसमध्ये होते. विधान परिषद निवडणुकीवेळी ज्या तयारीने उभय काँगेसचे नेते उतरले होते , त्याचा अध्र्यापटीनेसुद्धा या निवडणुकीची तयारी नव्हती. काही प्रमुख नेते तर ‘ हातावर हात ’ बांधून तर काही जण ‘घडाळ्याची  टिकटिक ‘ ऐकण्यात मग्न होते.

पालिका निवडणूक त्यांच्या गावीही नव्हती. तर , निवडणूक लढवणारे हसन मुश्रीफ हा एखादा अपवाद वगळता अंगाला फारशी तोशीस लावून घेण्याच्या मनस्थितीत कोणीही नव्हता. परिणामी त्यांच्या पारंपरिक गडाला भाजपने कधी सुरुंग लावला हेच त्यांना कळले नाही .

सर्वागाने थकलेले हे नेते आता जिल्हा परिषद जिंकण्याच्या दिवास्वप्नात वावरत आहेत.