लालू, मुलायम, ममता यांचे पक्ष हे व्यक्तिवादी आहेत तर गांधींचा काँग्रेस हा पारिवारीक पक्ष आहे. लोकशाहीला तिलांजली दिलेल्या विरोधकांना देशात स्थान उरलेले नाही, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व टीम मोदीचे सदस्य शाम जाजू यांनी आज (शनिवार) कोल्हापूर येथे केले.

लोकशाहीची बूज राखत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने लोकहिताचे निर्णय घेतल्याने जनतेचे पाठबळ वाढत चालले आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपचा अश्वमेध आणखी वेगाने दौडत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

वस्तू व सेवाकर (जीएसटी) कायद्याबाबत केंद्र सरकार राज्य सरकारच्या अधिकारावर कुठलेही अतिक्रमण करू इच्छित नाही, असा निर्वाळा देऊन जाजू म्हणाले. ‘एक देश एक कर’ या धोरणाची क्रांतीकारी पावले केंद्र सरकार टाकत आहे. यातूनच जनतेचे हित साधले जाणार आहे. जीएसटीबाबत विरोधकांकडून सूचना आहेत. पण विरोध केला जात नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

भारतीय जनता पक्षांत अन्य पक्षातून प्रवेश करणाऱ्यांना आम्ही रोखू इच्छित नाही. त्यांचे स्वागत करताना त्यांच्यातील क्षमतांचा वापर करून घेण्यातच ‘सबका साथ सबका विकास’ हे तत्व सामावले आहे. याचा अर्थ भाजपच्या जुन्या लोकांना विसरलो, असे होत नाही. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची मानसिकता पक्ष कार्यकर्त्यांनी ठेवली पाहिजे अन्यथा सरकार भक्कम होणार नाही.

नोटा निश्चलीकरणाच्या निर्णयानंतर देशात काळ्या पैशाचे व्यवहार चालणार नाहीत, असा संदेश गेला आहे. मोदी यांनी खंबीर भूमिका घेतली असल्याने सरकार सामन्यांचे आहे, असा विश्वास बळावत चालला आहे.

मागील ६५ वर्षांमध्ये काँग्रेसला काहीच करता आले नाही. ते मोदींनी अवघ्या अडीच वर्षांत करून दाखवले आहे. भाजपमध्ये स्थानिक पातळीवर मनभेद असले तरी मतभेद अजिबात नाहीत. वेगवेगळ्या प्रकारची माणसे, त्यांचा स्वभाव व महत्वकांक्षा घेऊन राजकारणात येतात. तेव्हा मनभेद स्वाभाविक आहे. तथापि, पक्षाचा आदेश मानणे सर्वांना बंधनकारक आहे, असा उल्लेख करत जाजू यांनी माध्यमातून भाजपचे रंगवले जाणारे वर्णन वस्तुस्थितीशी जुळणारे नसल्याचे स्पष्ट केले.