गुलाबी थंडीचे चाहूल नुकतीच लागली असताना शुक्रवारी दिवसभर आकाशात काळ्या ढगांची गर्दी झाल्याने पावसाळी वातावरण झाले होते. दुष्काळछाया अनुभवणाऱ्या शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा असली तरी एक थेंबही पाऊस पडला नाही. उलट वातावरणात काही प्रमाणात उकाडा जाणवत होता.
यंदा पावसाने सर्वाचीच निराशा केली आहे. पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोंबर हीटने लोकांना चांगलेच त्रस्त करून सोडले होते. ही हीट गेल्या आठवडय़ापर्यंत जाणवत होती. गेली दोनतीन दिवस मात्र पारा खालावला होता. थंडीची गुलाबी चाहूल लागली होती. थंडी आणखी वाढणार असा अंदाज करून लोकांनी थंडीचे नियोजन सुरू केले होते. मात्र आज सकाळपासून वातावरणात कमालीचा फरक पडला. थंडी गायब होऊन आकाशात काळे ढग गर्दी करून राहिले. सकाळपासूनच सूर्यदर्शन बंद झाले. दिवसभर असेच कुंद वातावरण कायम राहिले. पाऊस पडणार असे वाटत असताना त्याने प्रतीक्षा करायला लावली. थंडी जाणवण्याऐवजी उष्म्याची प्रचिती येत राहिली.