कोल्हापूर सराफ व्यापारी संघ आणि कोल्हापूर जिल्हा सराफ संघातर्फे उद्या गुजरी कॉर्नर येथे काळी रंगपंचमी साजरी करण्यात येणार आहे. दरम्यान, रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधान परिषद आमदार विद्याताई चव्हाण यांना सराफ व्यावसायिकांतर्फे निवेदन देण्यात आले.
अबकारी कराचा निषेध सुरू असलेल्या आंदोलनाचा उद्याचा २७वा दिवस आहे. सर्वत्र रंगपंचमीचा सण मोठय़ा उत्साहात साजरा होईल, मात्र सराफ व्यावसायिकांतर्फे याच्या माध्यमातून केंद्र शासनाचा निषेध केला जाईल.
या संदर्भात सुरेश गायकवाड आणि भरत ओसवाल यांनी रविवारी सांगितले, की केंद्र शासनाचा अशा अनोख्या प्रकारे आम्ही निषेध करीत आहोत. त्यासाठी सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी गुजरी कॉर्नर येथे उपस्थित राहावे. रंगपंचमीच्या उत्सवातून निषेध करायचा असला तरी पाण्याच्या दुíभक्ष्याकडेही आपण सर्वानी लक्ष द्यायचे आहे. त्यासाठी कमीतकमी पाण्याच्या वापराने रंग जातील अशा नसíगक रंगांचा वापर करावा.