विविध प्रकारच्या रंगाढंगात ल्यालेल्या महापालिका निवडणूक प्रचाराने शुक्रवारी अखेरच्या दिवशी कळसाध्याय गाठला गेला. फटाक्याच्या आतषबाजीत सवाद्य पदयात्रा काढून उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. तर रविवारी होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा तब्बल अडीच हजार कर्मचाऱ्यांसह सज्ज झाली आहे.
कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी ८१ प्रभागांसाठी रविवारी मतदान होत आहे. मतदानाची प्रचार सांगता शुक्रवारी झाली. अखेरच्या दिवसाची संधी साधत सर्वच पक्षांनी आज प्रचाराची राळ उठविली होती. सर्वच उमेदवारांनी पदयात्रा काढून शक्तिप्रदर्शन केले. कार्यकत्रे, मतदार, नातेवाईक यांच्याबरोबरच भाडोत्री कार्यकत्रेही प्रचारासाठी तनात केले होते. एकाच वेळी प्रभागांमध्ये सर्वच पक्षांच्या मिरवणुका निघाल्याने अवघे शहर प्रचारमय झाले होते. पक्षाच्या झेंडा, त्या रंगाच्या टोप्या, स्कार्फ घालून वातावरण निर्मिती करण्यावर भर देण्यात आला होता. प्रचारादरम्यान काही भागांमध्ये किरकोळ स्वरूपाच्या कुरघोडी झाल्या तर बहुतेक ठिकाणी सामंजस्याने प्रचारदौरे पार पडले. काही भागात प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या पदयात्रा समोरासमोर आल्या तेव्हा खिलाडूपणाचे दर्शन घडवीत उमेदवारांनी राजकीय वैर विसरून एकमेकांना हस्तांदोलन, आिलगन दिले. त्यामुळे काही क्षण राजकीय कटूता टळून मत्रिपूर्ण सामन्याचे दर्शनही घडले.
यंत्रणा सज्ज
दरम्यान, महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा तब्बल अडीच हजार कर्मचाऱ्यांसह सज्ज झाली आहे. ८१ प्रभागात ५०६ उमेदवार असून २०३० पुरुष तर २०२३ महिला मतदान करणार आहेत. त्यासाठी ३७८ मतदान केंद्रे निश्चित केली असून त्यातील १०२ मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. १६७ इमारतींमध्ये मतदान करता येणार आहे. त्यासाठी ७०० एव्हीएम मशिन वापरण्यात येणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी व शिपाई असे सुमारे दोन हजार कर्मचारी नियुक्त करण्यात आले असल्याची माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी पी.शिवशंकर यांनी सायंकाळी पत्रकारांना सांगितले.
पोलिस दक्ष
प्रशासनाप्रमाणेच पोलिसांनीही मतदान सुरळीत पार पडावे यासाठी यंत्रणा दक्ष ठेवली आहे. पसे व अन्य प्रकारच्या वस्तूंचे वाटप होणार नाही याकरिता विशेष लक्ष पुरविण्यात आले असून रात्रीच्या वेळी वेगळा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, असे पोलिस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांनी सांगितले. संवेदनशील असणाऱ्या ३८ इमारतींवर करडी नजर ठेवली जाणार आहे. बंदोबस्तासाठी एक पोलिस अधीक्षक, दोन अतिरिक्त पोलिस अधीक्षक, दहा उपअधीक्षक व एकाहत्तर पोलिस निरीक्षक अशी अधिकाऱ्यांची मोठी फळी तनात आहे. दंगा-मारामारी सारखे प्रकार घडल्यास घटनास्थळी कोणाचाही मुलाहिजा न बाळगता पोलिसी खाक्या दाखवणार असल्याचे शर्मा यांनी स्पष्ट केले.