कोल्हापूर जिल्ह्यातील विधान परिषदेच्या उमेदवारीवरून बंडखोरीचे सावट पडू लागल्याने पक्षश्रेष्ठींनी सावध भूमिका घेतली आहे. बंडखोरांना वेसण घालता यावी यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या एक दिवस अगोदर म्हणजे २९ नोव्हेंबर रोजी उमेदवारी जाहीर करून त्याच दिवशी ए.बी.फॉर्म देण्याचे नियोजन असल्याचे सूत्रांनी सांगितले. तर, शुक्रवारी विदेशातून परतल्यानंतर माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी उमेदवारीसाठी व्यूहरचना सुरू ठेवल्याने स्पध्रेत आणखी वाढ झाली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था गटातून निवडून द्यायच्या एका जागेची उमेदवारी मिळवण्यासाठी काँग्रेस पक्षात कधी नव्हे इतकी रस्सीखेच निर्माण झाली आहे. विद्यमान सदस्य महादेवराव महाडीक यांच्यासह विधानसभेचा दरवाजा बंद झालेले जिल्हाध्यक्ष पी.एन.पाटील, माजी मंत्री सतेज पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे या सर्वानी विधान परिषदेच्या मागील दाराने आमदार होण्याचे प्रयत्न चालवले आहेत. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह नवी दिल्लीतील श्रेष्ठींसमोर इच्छुकांनी शक्तिप्रदर्शन आरंभले आहे. मोठी चुरस निर्माण झाल्याने बंडखोरी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे पक्षश्रेष्ठी चिंतेत सापडले असून हा नाजूक पेच कसा सोडवावा, याचे नियोजन केले जात आहे.
प्रदेशाध्यक्ष चव्हाण हे २३ व २४ नोव्हेंबर रोजी मुंबईत येणार असून तेव्हा सहकाऱ्यांशी चर्चा करून उमेदवार कोण असावा, याचा निर्णय घेणार आहेत. मात्र, बंडखोरीच्या भीतीमुळे उमेदवारीची घोषणा २९ नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे. ३० नोव्हेंबर हा अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने इच्छुकांच्या राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे.
प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्याकडे झालेल्या मुलाखतीवेळी महाडीक व दोन्ही पाटलांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. चौथे इच्छुक आवाडे हे युरोप दौऱ्यावरून परतले असून त्यांनी तडक आपल्या उमेदवारीसाठी बांधणी सुरू ठेवली आहे. त्यांच्या समर्थकांनी वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन नगरपालिका, जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये सर्वाधिक मते आपल्याकडे असल्याचे सांगत आवाडे हेच प्रबळ दावेदार असल्याची भूमिका मांडली होती. आता आवाडे हीच भूमिका श्रेष्ठींच्या गळी उतरवण्यासाठी कार्यरत झाल्याने उमेदवारीच्या स्पध्रेतील चुरशीमध्ये नव्याने भर पडली आहे.