कोल्हापूर महापालिकेच्या चुरशीने झालेल्या निडणुकीच्या मतमोजणीचा निकाल बाहेर पडू लागला तसतशी करवीरनगरी सोमवारी दुपारनंतर जल्लोषात हरवून गेली. बाजी मारलेल्या विजयी उमेदवारांनी डॉल्बीच्या निनादात, गुलालाची उधळण करीत आणि फटाक्यांची आतषबाजी करीत जोरदार मिरवणूका काढून आनंद व्यक्त केला. दरम्यान, निकालातून कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. भाजप-ताराराणी महायुतीने सर्वाधिक ३२ जागा पटकाविल्या असल्या, तरी बहुमताचा ४१ हा जादुई आकडा गाठण्यात त्यांना यश आले नाही. काँग्रेसने अनपेक्षित रीत्या जोरदार  मुसंडी मारत सर्वाधिक २७ जागा पटकावत सर्वानाच धक्का दिला. गत वेळी महापालिकेच्या राजकारणात आघाडीवर असणारी राष्ट्रवादी काँग्रेस या वेळी केवळ १५ जागा मिळू शकल्याने मात्र तिसऱ्या स्थानावर फेकली गेली. चार जागा वगळता शिवसेनेच्या वाघांनी शेपूट घातली. डाव्यासह इतर पक्ष व संघटनांची पाटी कोरी राहिली. अपक्षांनी तीन जागा पटकाविल्या. सत्तेसाठी त्रिशंकु परिस्थिती निर्माण झाली असली, तरी सर्वात प्रथम काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येऊन सत्तासोपान गाठण्याची चिन्हे आहेत.
येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये आज सकाळी दहा वाजता मतमोजणीस सुरवात झाली. प्रथम पोस्टल मतपत्रिकांची मोजणी होऊन नंतर इलेक्ट्रॉनिक यंत्रावरील मतमोजणीस सुरुवात झाली. महापालिका निवडणुकीसाठी सात विभागीय निवडणूक कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या प्रभागांनुसार मतमोजणी झाली. यासाठी सात मोतमोजणी कार्यालयात ही प्रक्रिया पार पडली.
सलामी काँग्रेसची
सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान शाहू मार्केट यार्ड प्रभाग क्रमांक २० मधील राष्ट्रीय काँगेसच्या उमेदवार सुरेखा शहा या  ३७९ मताधिक्य घेऊन विजयी झाल्या. या विजयाने काँग्रेसने विजयाची सलामी करून दिली.
निकालाचा सी-सॉ सुरू
निकालीच्या पूर्वार्धामध्ये भाजप-ताराराणीची जोमदार घोडदौड सुरू होती. तुलनेत काँग्रेस-राष्ट्रवादी बरीच मागे पडली होती. सेना तर कोठेच फारसी दिसत नव्हती. ३० हून अधिक जागांचे निकाल येऊ लागले तसतसे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला घवघवीत यश मिळाले. कसबा बावडा या सतेज पाटील यांच्या प्रभागातील सर्व सहा जागा जिंकल्याने काँग्रेसला हात मिळाला.
पक्षीय बळाबळ
काँग्रेस      २७
राष्ट्रवादी    १५
भाजप       १३
ताराराणी   १९
शिवसेना   0४
अपक्ष       0३
एकूण       ८१