22 October 2019

News Flash

कोल्हापूरचा गड राखण्याचे राष्ट्रवादीपुढे आव्हान

 कोल्हापूर जिल्ह्य़ात गेली अनेक दशके काँग्रेसचा हात आपली ताकद सातत्याने दाखवत होता

(संग्रहित छायाचित्र)

दयानंद लिपारे

दोन खासदार, तीन मंत्री, विधानसभा अध्यक्षपद, जिल्हा परिषद, जिल्हा बँक, बाजार समिती येथे एकहाती वर्चस्व असा जबरदस्त एकेकाळी वरचष्मा असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसपुढे दोन दशकांनंतर कडवे आव्हान उभे राहिले आहे. जिल्ह्य़ातील काही महत्त्वाच्या सत्तास्थानावर असूनही राष्ट्रवादीचे पूर्वीचे वैभव आता लोप पावत आहे. लोकसभेची  जागा गमावल्यानंतर आता पक्षातील गळती रोखण्याबरोबरच विधानसभेत यश मिळविण्यासाठी झगडावे लागत आहे.

कोल्हापूर जिल्ह्य़ात गेली अनेक दशके काँग्रेसचा हात आपली ताकद सातत्याने दाखवत होता. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापन करण्यापूर्वीच कोल्हापुरात आधीपासूनच राजकारण, सहकार, समाजकारण अशा अनेक क्षेत्रांत कार्यरत असणारा मोठा वर्ग पवार यांचे नेतृत्व मानणारा होता. त्यातील बहुतेकांनी पवारांची पाठराखण केली. त्यातून कोल्हापूर जिल्ह्यत राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद मोठय़ा प्रमाणात वाढली. काल जन्माला आलेले कॉंग्रेसचे हे भावंड जिल्ह्यच्या राजकीय पटलावर थोरला भाऊ  म्हणून पुढे आले तर इंदिरा कॉंग्रेसचे स्थान धाकटय़ा भावाचे दुय्यम स्वरूपाचे राहिले. पवार यांनीही आपल्याला शक्ती देणार्यांना महत्वाची पदे आवर्जून दिली.

राष्ट्रवादीचे वाढते प्राबल्य

राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर पदार्पणातच या पक्षाने लोकसभा निवडणुकीत आपला ठसा उमटवला. जिल्ह्य़ातील दोन्ही मतदारसंघांत सदाशिवराव मंडलिक आणि शिवसेनेतून पक्षात आलेल्या निवेदिता माने यांनी दणदणीत विजय मिळवला. पुढे विधानसभा निवडणुकीतही विनय कोरे, दिग्विजय खानविलकर, हसन मुश्रीफ, बाबासाहेब कुपेकर, नरसिंग गुरुनाथ पाटील असे १२ पैकी पाच आमदार निवडून आले. बहुतेकांनी काँग्रेसच्या उमेदवारांना पराभूत केले होते. पुढे लोकसभा, विधानसभा निवडणुकीत उभय ऐक्य झाले. राष्ट्रवादीचे दोघे खासदार पुन्हा संसदेत पोहोचले, तर विधानसभा निवडणुकीत पक्षाचा करिश्मा कायम राहिला. खानविलकर, कुपेकर,  मुश्रीफ अशा तिघांच्या लाल दिव्याच्या गाडय़ा एकाच वेळी जिल्ह्य़ात फिरू लागल्या. नंतर, कुपेकर यांच्याकडे सभागृहातील सर्वोच्च विधानसभेचे अध्यक्षपद आले. याच वेळी सहकार क्षेत्रातही घडय़ाळाचा आवाज घुमू लागला. जिल्हा परिषद, जिल्हा बँक, बाजार समिती आदी ठिकाणी राष्ट्रवादीची वट वाढली.

गळती, संघर्ष आणि भवितव्य

राष्ट्रवादी काँग्रेसची शक्ती वाढू लागली तसे विसंवादाचे सूरही उमटू लागले. विनय कोरे यांनी पक्षातून बाहेर पडून जनसुराज्य शक्ती पक्षाची स्थापना केली. सदाशिवराव मंडलिक यांचा तालुका पातळीवर हसन मुश्रीफ यांच्याशी संघर्ष सुरू झाला. मंडलिक आणि मुश्रीफ यांच्यातील वादात जिल्ह्य़ात पक्षाचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. २००९च्या निवडणुकीत सदाशिवराव मंडलिक यांनी थेट शरद पवारांना आव्हान दिले. अपक्ष म्हणून ते निवडून आले होते. तर निवेदिता माने यांना २००९ सालच्या निवडणुकीत राजू शेट्टी यांनी पराभूत केले. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादीचा गड राखला होता. या वर्षी, पवार यांनी दूरवरचा विचार करून महाडिक, शेट्टी यांना उभे केले. पाचवेळा कोल्हापूर जिल्ह्य़ाचा दौरा केला, पण दोन्ही ठिकाणी पराभवाला सामोरे जावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा हादरा ठरला. अशातच धनंजय महाडिक हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर भाजप- शिवसेनेचे बळ वाढले असताना पक्षातील सुंदोपसुंदी रोखून यशाची पुनरावृत्ती करणे हे मुश्रीफ व कुपेकर या आमदारद्वयींसमोर कडवे आव्हान असणार आहे.

आघाडीतून वाटय़ाला येणाऱ्या अन्य जागांवर यश मिळवणे हेही खडतर आव्हान असणार आहे. या कसोटीला कितपत पक्ष उतरणार यावर राष्ट्रवादीचे कोल्हापूर जिल्ह्य़ाचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

सामना चंद्रकांतदादांशी

विधानसभा निवडणूक सुरू असतना पक्षाला अस्तित्व टिकवण्यासाठी लढावे लागत आहे. जिल्हाध्यक्ष निवडीचा वाद कसा तरी मिटवला असला तरी राधानगरी मतदारसंघात आजी, माजी जिल्हाध्यक्ष आणि पाहुणे- मेहुणे असलेले ए. वाय. पाटील, माजी आमदार के. पी. पाटील यांच्यात उमेदवारी मिळवण्याचा संघर्ष सुरू आहे. प्रकरण बंडखोरीपर्यंत जाण्याची चिन्हे आहेत. याच मतदारसंघातून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील निवडणूक लढवणार अशी चर्चा असल्याने मुकाबला करताना राष्ट्रवादीच्या ऐक्याची कसोटी लागणार आहे. जिल्ह्य़ाचे नेतृत्व आमदार हसन मुश्रीफ करत असले तरी सत्ताधारी पक्षाने त्यांना लक्ष्य केले आहे. म्हाडा पुणेचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांना ताकद दिली जात आहे. आमदार संध्यादेवी कुपेकर यांची हॅट्ट्रिक होऊ द्यायची नाही, अशी विरोधकांची योजना आहे.

First Published on June 12, 2019 12:55 am

Web Title: challenge to ncp from kohalpur