X

नेत्यांचे ऐक्य टिकवण्याचे काँग्रेसपुढे आव्हान ; कोल्हापूरच्या जागेवरून आघाडी दुभंगलेली

काँग्रेसने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराला प्रारंभ केला.

कोल्हापूर : केंद्र व राज्य शासनाचे अपयश दाखवून देण्यासाठी निघालेल्या प्रदेश काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेची कोल्हापुरातील सुरुवात धडाक्यात झाली. प्रदीर्घकाळानंतर काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी ऐक्याचे थर लावत निवडणुकीची दहीहंडी फोडण्यासाठी हात उंचावले. त्यांच्यातील एकोपा पाहायला मिळाल्याने कार्यकर्त्यांतही उत्साह निर्माण झाला. याचवेळी या नेत्यांच्या उमेदवारीलाही हिरवा कंदील दर्शविला गेल्याने संघर्ष यात्रेचा नूर प्रचार यात्रेत बदलला. खासदार राजू शेट्टी यांना निवडणुकीसाठी एकत्र राहण्याचे आवतण देऊन मैत्रीचा नवा घरोबा जोडण्याचा प्रयत्न केला. कोल्हापुरातील काँग्रेसमध्ये निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. राष्ट्रवादीकडे असलेल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर हक्क सांगायला काँग्रेसने सुरुवात केल्याने वादाची ठिणगी पडलीच.

जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराला प्रारंभ केला. महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी, काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार विजय वडेट्टीवार, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चारुलता टोकस आदी प्रमुख नेत्यांनी केद्र व राज्य सरकारच्या कामगिरीवर जोरदार टीकास्त्र सोडले. प्रमुख नेत्यांनी कोल्हापुरातील नेत्यांच्या ऐक्याचे कौतुक केले. इतक्यावर न थांबता त्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारीचा हिरवा कंदील दर्शविला. किंबहुना कोल्हापुरात करवीर निवासिनी महालक्ष्मीच्या साक्षीने सतेज पाटील आणि श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे श्री दत्ताच्या साक्षीने माजी मंत्री जयवंतराव आवळे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, शिरोळच्या दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या प्रचाराचा नारळ फोडला गेला. निवडणुकीच्या सभास्थानाचे वातावरणही सरकार विरोधातील संघर्षांपेक्षा विधानसभा प्रचाराला साजेसे असेच राहिले. त्याला स्थानिक नेत्यांच्या गळाभेटीचे कोंदण लाभले गेले.

करवीरची गादी वादात!

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात पूर्वीचे काँग्रेसचे उदयसिंहराव गायकवाड निवडून येत होते. सलग पाच वेळा ते निवडून आले असल्याच्या इतिहासाकडे उंगलीनिर्देश करीत आमदार सतेज पाटील यांनी लोकसभेची कोल्हापूरची जागा काँग्रेस पक्षाला मिळावी, या जागेवरचा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी आपली राहील, असे यात्रेच्या पहिल्याच जाहीर सभेत स्पष्ट केले. त्यांच्या या मागणीला प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. ‘तुम्ही मागाल ते उमेदवार दिले जातील’, असे चव्हाण यांनी आश्वस्त केले. वास्तविक, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक हे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीची जागा काँग्रेसकडे घेण्याच्या मागणीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यातील ऐक्यात अडथळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सतेज पाटील यांच्या मागणीवर महाडिक यांनी जोरदार टीका करीत ती बिनबुडाची असल्याचे सांगून, शरद पवार यांच्या आशीर्वादाने आपण पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आमदार पाटील यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा हक्क सांगितला असला, तरी महाडिक यांच्या विरोधातील नाराजीही त्याला कारणीभूत ठरत आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ आणि खासदार महाडिक यांच्यात पक्षांतर्गत फारसे सख्य नाही. जिल्हा परिषद,  महानगरपालिका, नगरपालिका निवडणुकीत महाडिक पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारात सहभागी न झाल्याने हा वाद निर्माण झाला आहे. त्यातून मुश्रीफ यांनी दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे शिवसेनेत प्रवेश केलेले सुपुत्र संजय मंडलिक यांना उमेदवारी देण्याचे प्रयत्न चालविले आहेत. मुश्रीफ, सतेज पाटील, मंडलिक यांचे अलीकडच्या काळात एकाच मंचावर येण्याचे प्रमाणही वाढले आहे. मैत्रीचा हा त्रिकोण खासदार महाडिक यांना विरोध करताना दिसत आहे. त्यामुळे महाडिक यांच्यासमोर प्रथम राष्ट्रवादीतील आणि नंतर मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसमधील नाराजीला तोंड द्यावे लागणार आहे. यातून राष्ट्रवादीचे नेते कसा मार्ग काढणार यावरच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ऐक्याच्या भवितव्याची वाटचाल ठरणार आहे.

गटबाजी खरोखरच मिटली?

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील-सतेज पाटील आणि हातकणंगले तालुक्यात जयवंतराव आवळे-प्रकाश आवाडे यांच्यातील गटबाजी टोकाला पोहोचली होती. निवडणुकीनंतरच्या लाल दिवा मिळवण्याच्या आकर्षणातून परस्परांचा काटा काढण्याचा प्रयत्न झाला आणि त्यात हे सर्वच प्रमुख नेते गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. काँग्रेसच्या बालेकिल्लय़ातच पक्षाचा एकही आमदार विधानसभेत न पोहोचण्याची नामुष्की ओढविली होती. सत्ता गेल्यानंतर त्यांची गेली साडेतीन वर्षे विरोधक म्हणून कामगिरी प्रभावशून्य ठरली. पण, आता काँग्रेसचे स्थानिक नेते निवडणुकीच्या तोंडावर सक्रिय झाले आहेत. सत्तेचे लागलेले वेध हे यामागचे मुख्य कारण असल्याचे दिसते. सत्तासोपान गाठायचे असेल आणि त्याहीपेक्षा तत्पूर्वी निवडून यायचे असेल तर गटबाजीला तिलांजली देणे गरजेचे असल्याचा साक्षात्कार झाल्यानंतर हे सर्व नेते जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने जाहीरपणे एकत्र आले. शिवाय, ‘हातात हात घालत’ यापुढे ‘पायात पाय घालण्याचे’ राजकारण करणार नाही आणि परस्परांना निवडून आणण्यासाठी कटिबद्ध राहू, अशा आणाभाकाही त्यांनी घेतल्या. नेत्यांनी गळ्यात गळे घातल्याचे पाहून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनीही आतापासूनच प्रचाराला सुरुवातही केली आहे. नेत्यांचे ऐक्य पाहता त्यांना निवडणुकीचा मार्ग पूर्वीपेक्षा अधिक सुकर दिसू लागला आहे. एखाद्या जिल्ह्यातील काँग्रेसमधील गटबाजी संपुष्टात आल्याचे पाहून राज्याच्या प्रमुख नेत्यांनाही आनंद झाला. त्यांनी कोल्हापूरच्या ऐक्याचा हा कित्ता राज्यभर गिरवला जावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

राजू शेट्टींना मैत्रीची साद

निवडणुकीला सामोरे जाताना नवे मित्र जोडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्याची मशागत करण्यास कोल्हापुरातूनच सुरुवात केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी भाजपपासून अलग होण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेसने त्यांच्याकडे मैत्रीचा हात पुढे केला आहे. त्यासाठी हातकणंगले लोकसभा मतदारसंघ शेट्टी यांना सोडण्याची तयारी जाहीरपणे दर्शवण्यात आली. शेट्टी यांनीही प्राथमिक स्तरावर काँग्रेसच्या सत्तेविरोधातील संघर्षांचे स्वागत केले आहे. एकेकाळचा कडवा विरोधक मैत्रीच्या पातळीवर आणण्यात संघर्षयात्रा पुढचे पाऊल टाकण्यात यशस्वी होताना दिसली.