दयानंद लिपारे,कोल्हापूर

भाजप प्रदेशाध्यक्षपदी राज्याचे महसूल आणि कोल्हापूर जिल्ह्य़ाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची निवड झाल्याने भाजपला पश्चिम महाराष्ट्राचा गड सर करण्यास मोठी मदत होणार आहे. हा भाग त्यांना तळहातावरच्या रेषेप्रमाणे पाठ असल्याने आणि लोकसभा निवडणुकीत त्याची चुणूक दाखवल्याने विधानसभेतही ते चांगली कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त केला जातो.

कोल्हापूर जिल्हा पर्यटनाच्या नकाशावर झळकण्यासाठीं पाटील यांनी ‘आडवाटेवरचं  कोल्हापूर’ हा अनोखा उपक्रम सुरू करून पर्यटकांना पर्यटनातील अनवट वाटा शोधून दिल्या. अलीकडे, भाजपने पश्चिम महाराष्ट्रात चंचुप्रवेश केला असला तरी या यशाला आयारामांच्या ताकदीची जोड असल्याने पक्षाचे संघटनात्मक बळ वाढवण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या पाटील यांना सह्य़ाद्रीच्या खोऱ्यातील आडवाटेवर भाजपचे निशाण आणि संघटनात्मक बाजू भक्कम करण्याचे आव्हान आहे.  विधानसभा निवडणुकीचा पेपर भाजपला सोपवा वाटत असला तरी कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस- राष्ट्रवादीची ऊर्जा अद्यापही असल्याने आणि आघाडीचे दोन्ही प्रदेशाध्यक्ष याच भागातले असल्याने कमळ फुलवण्याचे आव्हान पाटील यांना पेलावे लागेल.

रावसाहेब दानवे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी देण्यात आली तेव्हापासून प्रदेशाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याकडे सर्वाचे लक्ष होते. मंगळवारी चंद्रकांत पाटील यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. हे वृत्त कळताच कोल्हापुरातील कार्यकर्त्यांनी आनंद साजरा करतानाच लाडक्या ‘दादां’च्या नेतृत्वाखाली राज्यात विधानसभा निवडणुकीत धवल यश मिळेल, असा विश्वासही व्यक्त केला गेला.

राज्य सरकारमधील दुसऱ्या क्रमांकाचे मंत्रीपद आणि आता विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून संघटनेची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आल्याने प्रदेशाध्यक्षपदाचा पत्ता पाटील यांच्या पाकिटावर पडल्याने ‘जिथे पोहचू तेथे यश खेचून आणू’ हा त्यांच्या कामाचा खाक्या असल्याने विधानसभा निवडणुकीत ते पश्चिम महाराष्ट्रात कमळ फुलवतील, असा विश्वास कार्यकर्त्यांना आहे. तसे पाहता राजकीय फड मारणे पाटील यांच्यासाठी नवे नाही. एकनाथ खडसे यांच्या गच्छंतीनंतर महसूल खाते मिळवलेल्या पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्रात निवडणूक व्यवस्थापनाची जबाबदारी पार पडताना सांगली, सोलापूर, पुणे, नगर महापालिका, डझनभर नगरपालिका, बहुतांशी जिल्हा परिषदा येथे भाजपचा झेंडा रोवला. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे, उदयनराजे भोसले आणि अमोल कोल्हे वगळता उर्वरित महाआघाडीच्या उमेदवारांचा पराभव करण्यात पाटील यांची रणनीती प्रभावीच नव्हे तर यशस्वी ठरली. लोकसभेतील यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी त्यांनी मांड ठोकली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची व्यूहरचना, मतदारसंघ, त्यातील उमेदवारांचा प्रभाव,चेहरा, प्रचाराचे मुद्दे, कार्यकर्त्यांचे संघटनात्मक बळ आदी मुद्दे प्रभावी ठरतात. त्यांचा अभ्यास करून पाटील यांना या लढय़ात उतरावे लागणार आहे.

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची संधी चंद्रकांत पाटील यांच्या रूपाने पश्चिम महाराष्ट्राला मिळाली आहे. त्यांना संपूर्ण राज्यात लक्ष घालावे लागणार असले तरी पश्चिम महाराष्ट्राकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. विदर्भात देवेंद्र फडणवीस, मराठवाडय़ात दानवे, पंकजा मुंडे, उत्तर महाराष्ट्रात गिरीश महाजन असे तगडे नेतृत्व आहे. दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीची खरी ताकद पश्चिम महाराष्ट्रात आहे.

खेरीज, आघाडीने विधानसभा जिंकण्याची तयारी चालवली असून राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांच्यापाठोपाठ आता काँग्रेसनेही बाळासाहेब थोरात या पश्चिम महाराष्ट्रातील प्रभावशाली नेतृत्वाकडे पक्षाची जबाबदारी सोपवली आहे. काँग्रेस – राष्ट्रवादीला उतरती कळा लागली असली विधानसभा काबीज करण्याला महत्व दिले असून तयारी सुरू केली आहे.

गणित लोकसभेचे आणि विधानसभेचे

निवडणुकीनुसार राजकीय गणिते बदलत जातात, असे राजकीय विश्लेषकांचे निरीक्षण आहे. गेल्या लोकसभेत भाजपला दमदार यश मिळूनही नंतर झालेल्या दिल्ली, बिहार मध्ये यशाने हुलकावणी दिली होती याकडे ते लक्ष वेधतात. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत कोल्हापूरचे चंद्रकांत पाटील पश्चिम महाराष्ट्राला कितपत यश मिळवून देतील याबाबत राजकीय अभ्यासक डॉ. अशोक चौसाळकर म्हणाले, ‘पूर्वीच्या तुलनेत भाजपचे या भागातील बळ  वाढले आहे. त्याला उभय काँग्रेसमधून आलेल्यांची मदत मोठी आहे. राजकीय यश लाभूनही अद्यापही या भागात भाजप उभय काँग्रेस इतकी रुजलेली नाही. सहकार, शिक्षण संस्थांचे जाळे असल्याने आणि कार्यकर्त्यांचे, पक्षाचे संघटन असल्याने दोन्ही काँग्रेसचा अंमल टिकून आहे. या पाश्र्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांना भाजपचे संघटन आणि कार्यकर्ते निर्माण करण्यासाठी बरेच काम करावे लागेल. मोदींचा करिष्मा असला तरी भाजपची संघटनात्मक जोड देण्यासाठी पाटील यांना मेहनत घ्यावी लागेल. संघटनेच्या कामाचा अनुभव असल्याने त्यांना याचा फायदा निश्चितच होऊ  शकतो’, असा विश्वासही  त्यांनी व्यक्त केला.